Ajinkya Shinde now takes charge of the CJP agitation : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंत्र येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या गोटात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईमुळे आंदोलनाच्या नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, अभिजित दिपके यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली असून, आता ही जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास हे दिल्लीतील आंदोलनासाठी पोहोचले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना बसमधून अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. सीजेपीच्या तीन प्रमुख नेत्यांवर झालेल्या या कारवाईमुळे जंतरमंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ शेअर करत आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली.
‘प्रिय, पंतप्रधान अंबानी!’ एलॉन मस्क यांची पोस्ट चर्चेत, स्टारलिंकच्या परवानगीवरून मोदी सरकारवर निशाणा
आपण आणि आपल्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगत, आपल्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांनी अजिंक्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे आवाहन दिपके यांनी व्हिडीओतून केले. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाच्या पुढील घडामोडींमध्ये अजिंक्य शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजिंक्य शिंदे हे 35 वर्षांचे असून, कॉकरोच जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. भाजपमध्ये बी. एल. संतोष आणि काँग्रेसमध्ये के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे असलेल्या संघटनात्मक भूमिकांशी त्यांच्या जबाबदारीची तुलना केली जात आहे.
आता अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीतील आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे आली आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक क्षमतेची आणि आंदोलनाचे नेतृत्व पुढे नेण्याच्या त्यांच्या भूमिकेची परीक्षा होणार आहे. अजिंक्य शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आम आदमी पार्टीशी त्यांचे कथित संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. शिंदे हे यापूर्वी महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे संयोजक म्हणून कार्यरत होते, असा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवरून केला जात आहे. तसेच, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. जुलै 2022 मधील एक पोस्टरही प्रसारित होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी होणे आवश्यक आहे.
मतदार यादीतून नाव वगळण्याची मागणी करताय? निवडणूक आयोगाने फॉर्म 7 अर्जांसाठी निश्चित केली नवी मर्यादा
सोशल मीडियावरील छायाचित्रे किंवा पोस्टर यांवरून सध्याचे राजकीय संबंध निश्चितपणे सिद्ध होत नाहीत. एकीकडे सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन पुढे कशा पद्धतीने सुरू राहणार आणि अजिंक्य शिंदे यांची भूमिका काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.
