Download App

NCP : मी राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवारांना बैठक घेण्याचा अधिकारच नाही : अजितदादा आता पूर्णपणे भिडले

दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत आज (6 जुलै) ही बैठक पार पडत आहे. मात्र अजित पवार यांच्यावतीने या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 30 जूनच्या बैठकीत निवड बहुमताने त्यांची निवड झाली आहे. आता हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. त्यामुळे शरद पवार यांना अशी बैठक बोलवण्याचा किंवा घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा अजितदादांच्या गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिण्यात आलं आहे. (Ajit Pawar objected to the meeting being held in the presence of Sharad Pawar in Delhi)

काय म्हंटलं आहे पत्रात?

1. विविध माध्यमांच्या वृत्तांतून असे कळते की श्री. शरद पवार यांनी आज, ०६.०७.२०२३ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्यसमिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे.

2. श्री. अजित पवार 30.06.2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या तसेच विविध संघटनात्मक पदांवर कार्यरत असलेल्या सदस्यांच्या प्रचंड पाठिंब्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले.

3. श्री. अजित पवार यांनी भारताच्या माननीय निवडणूक आयोगाकडे याचिकाही दाखल केली आहे, ज्यामध्ये ते खर्‍या राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांना चिन्हासह पक्षाचे नाव देण्यात यावे. अशी मागणी केली आहे.

4. वास्तविक राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व कोण करतो या प्रश्नावरील वाद हा निवडणूक आयोगाच्या विशेष अधिकारक्षेत्रात आहे. त्यामुळे जोपर्यंत पक्षाध्यक्षांच्या वादावर निवडणूक आयोगाद्वारे निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत पक्षातील कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्य समिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राज्य यांची कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नाही.

5. त्यामुळे आज, 06.07.2023 रोजी, होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्यसमिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला कोणताही कायदेशीर आधार नाही. पुढे, कथित राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्यसमिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राज्य पक्षाध्यक्षांमध्ये घेतले जाणारे कोणतेही निर्णय वैध कायदेशीर आधार नसतील आणि ते पक्षातील कोणावरही बंधनकारक नसतील.

दिल्लीत बैठकीला कोण उपस्थित?

दरम्यान, शरद पवार यांनी बोलविलेल्या आजच्या बैठकीला कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण, योगेंद्र शास्री, विरेंद्र शास्री, नरेंद्र वर्मा धीरज शर्मा, सोनिया दुहन, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल, एस. कोहली, व्ही पी शर्मा उपस्थित आहेत.

Tags

follow us