आज सायंकाळी 6.55 मिनिटांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, स्फोट घडल्यानंतर दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
देशाची राजधानी दिल्ली भीषण स्फोटाने हादरल्याने मुंबईसह प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या असून स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या शरिरीचे अवयवही रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यावरुन, या स्फोटाची दाहकता लक्षात घेता येईल.
दरम्यान, अद्याप या स्फोटाचं कारण समजलं नसले तरी मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला संबोधित करताना घटनेची माहिती दिली.
लाल किल्ला परिसरात स्फोट, ब्लास्टमध्ये कोणत्या गाडीचा वापर? पोलिसांनी लावला छडा
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला. लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एक ह्युंडाइ आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये काही पादचारी प्रवासी जखमी झाले असून काही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे समजते. स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटांत दिल्ली स्पेशल पोलीस पथक, दिल्ली क्राइम ब्रांच घटनास्थळी दाखल झाली होती. NSG आणि NIA च्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह FSL स्फोटाचा तपास सुरु केला आहे.
परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. तसंच, मी दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी यांच्यशी फोनवरुन संवाद साधला. दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही विचार करत सर्वच बाजुंनी विचार करत तपास सुरू आहे. तपास सुरू असून लवकरच जनतेपुढे या घटनेची संपूर्ण माहिती दिली जाईल, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.या संवादानंतर अमित शाह रुग्णालयात जखमींच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
