Mallikarjun Kharge Remark : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. बिहारमधील पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या विधानाला अपमानास्पद ठरवत भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या वादात उडी घेत खरगे यांच्यासह काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
पाटणा येथील कार्यक्रमात खरगे भाजपावर टीका करत असताना उपस्थितांपैकी एका व्यक्तीनं ‘मोदी नही जायेंगे’ असं म्हटलं. त्यावर उत्तर देताना खरगे यांनी ‘मोदी का बाप भी जाएगा’ असं विधान केलं. सभेत सर्वांसमोर करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजपाकडून या विधानाचा निषेध केला जात असून, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना मर्यादा पाळायला हव्या होत्या, अशी भूमिका भाजपाचे नेते मांडत आहेत.
खडगे यांच्या वक्तव्याने बिहारमध्ये गोंधळ, मोदींबाबतच्या विधानानंतर सभेतच मारहाण
अमित शाह यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून खरगे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांविषयी बोलताना खरगे यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप शाह यांनी केला. यासोबतच त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांचाही उल्लेख केला. मोदी यांच्या आईविषयी केलेली वक्तव्ये, त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हणणं आणि ‘चायवाला’ असा उल्लेख करून त्यांच्या गरिबीची खिल्ली उडवल्याचा आरोप करत शाह यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसकडून वारंवार मर्यादा ओलांडल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसचा गेल्या 12 वर्षांपासून विविध निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याचा दावा करत अमित शाह यांनी पक्षाकडे आता कोणतीही ठोस रणनीती उरलेली नसल्याचं म्हटलं आहे. जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे काँग्रेस नेते केवळ टीका आणि अपशब्दांचा आधार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाचे कार्यकर्तेही काँग्रेसपासून दूर जात असल्याचं शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान, खरगे यांच्या विधानावर भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
