Amul Reduces 700 products Prices : अमूलची पॅरेंट कंपनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने शनिवारी मोठी घोषणा केली आहे. संस्थेने सांगितले की, 700 हून अधिक उत्पादनांच्या पॅकच्या किमती कमी करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या GST सुधारणांचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार असून यात तूप, लोणी, आइस्क्रीम, बेकरी प्रॉडक्ट्स आणि फ्रोजन स्नॅक्ससारख्या वस्तूंचा समावेश आहे.
कंपनीच्या (Amul) माहितीनुसार, या बदलाचा परिणाम लोणी, तूप, आइस्क्रीम, चीज, पनीर, चॉकलेट, बेकरी आयटम्स, फ्रोजन स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड आणि माल्ट-बेस्ड ड्रिंक अशा अनेक कॅटेगरीवर होणार आहे. अमूलचं म्हणणं आहे की, किंमत कमी झाल्यामुळे आइस्क्रीम, चीज (Cheese) आणि लोणीचा वापर वाढेल. भारतात प्रतिव्यक्ती डेअरी उत्पादनांचा वापर तुलनेने कमी असल्याने (Paneer Ghee Chocolate) हा निर्णय मोठ्या विकासाची संधी ठरेल.
36 लाख शेतकऱ्यांच्या मालकीच्या GCMMF ला अपेक्षा आहे की, किमती कमी झाल्याने उत्पादनांची मागणी आणि विक्री वाढेल. याआधी मदर डेअरीनेही दरकपातीची घोषणा केली होती, जी 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. काही उत्पादनांमध्ये तब्बल ₹40 पर्यंत कपात करण्यात आली आहे.
दुधाच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण पॅकेट दूध आधीपासूनच 0% GST मध्ये आहे. GCMMF चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सांगितले की, दुधावर GST आधीपासून शून्य असल्याने त्याच्या किंमतीत कपात करण्यात आलेली नाही. संस्थेच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे डेअरी उत्पादनांची मागणी आणि टर्नओव्हर वाढेल. अमूल ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या GCMMF चं मागील आर्थिक वर्षातलं उत्पन्न 11% वाढून ₹65,911 कोटींवर पोहोचलं आहे.