हैदराबाद : “राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही आता पन्नाशी ओलांडली आहे, एकटेपणा तुम्हाला त्रास देत असेल, त्यामुळे कोणीतरी जोडीदार शोधा, हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्हीही सोडणार नाही, असा इशारा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिला.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (28 नोव्हेंबर) अंतिम दिवस आहे. 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. (Asaduddin Owaisi critisize Congress leader Rahul Gandhi over his remarks about the former being a friend of Prime Minister Narendra Modi.)
याच प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी तेलंगणातील एमआयएम आणि भारत राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली होती. “मोदीजी के है दो यार, ओवेसी और केसीआर” असे तेलंगणातील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले होते. केसीआर यांना मोदींनी पंतप्रधान व्हावे आणि मोदींना केसीआर मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. असेही ते म्हणाले होते.
भारत राष्ट्र समितीचे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष प्रथम तेलंगणात बीआरएसचा आणि नंतर केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. देशातील हा सर्वात जुना पक्ष आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा दावाही राहुल गांधी यांनी पुढे बोलताना केला.
याचनंतर औवेसी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही पन्नाशी ओलांडली आहे, एकटेपणा तुम्हाला त्रास देत असेल, कोणीतरी शोधा, पण हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्हीही सोडणार नाही, असा इशाराच औवेसी यांनी दिला.