नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला (Asaram Bapu) सोमवारी गुजरातमधील गांधीनगर न्यायालयाने एका महिला शिष्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आसारामविरोधात २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश डीके सोनी आज याप्रकरणी शिक्षा सुनावणार आहेत. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंगळवारी सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार आहे.
दरम्यान आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, 2013 मध्ये आसारामवर सुरतच्या एका तरुणीने अत्याचाराचा आरोप केला होता, तर तिच्या लहान बहिणीने नारायण साईवर अत्याचाराचा आरोप केला होता.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींमध्ये एप्रिल 2022 मध्ये वाढ झाली होती, जेव्हा यूपीच्या गोंडा येथील तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. बराच वेळ आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये मृतदेह आढळून आला. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी 4 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, तिचा मृतदेह अनेक दिवसांपासून आसाराम बापूंच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला होता. हे प्रकरण नगर कोतवाली भागातील विमौरचे आहे. येथे आसारामचा आश्रम आहे. ही अल्पवयीन मुलगी 5 एप्रिलपासून बेपत्ता होती. कारमधील मृतदेह तेव्हाच ओळखता आला जेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागली. आश्रमाच्या कर्मचाऱ्याने गाडी उघडली असता त्यात मुलीचा मृतदेह पडलेला दिसला.
10 वर्षांपासून तुरुंगवास भोगतोय आसाराम
तुरुंगात असलेल्या आसारामनं नुकताच न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जात आसारामनं म्हटलं होतं की, आपण गेल्या 10 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. तो गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याच्या जामीन अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला योग्य उपचार मिळावेत म्हणून जामीन देण्याचे आदेश द्यावेत.