Download App

BJP प्रवेशाच्या चर्चा असणारे अशोक चव्हाण थेट वर्किंग कमिटीमध्ये; यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदेंचेही प्रमोशन

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची थेट काँग्रेस वर्किंग कमिटीत वर्णी लागली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह खासदार मुकुल वासनिक, खासदार रजनीताई पाटील, आमदार यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे आणि चंद्रकांत हांडोरे या नेत्यांचाही वर्किंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्या जागी चव्हाण यांना संधी दिली आहे. (Ashok Chavan, Yashomati Thakur, Praniti Shinde, Chandrakant Handore promoted to CWC)

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर नवीन वर्किंग कमिटीचे गठन करण्यात येते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 23 सदस्यीय वर्किंग कमिटी बरखास्त करून त्याजागी 47 सदस्यीय सुकाणू समिती नेमली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 84 सदस्यांसह नवीन वर्किंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. यात 39 सदस्य,  कायम निमंत्रित 18, प्रभारी 14, विशेष आमंत्रित 9, पदसिद्ध सदस्य 4 अशा एकूण 84 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्यासोबतच अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

वर्किंग कमिटीचे महत्व :

कार्यकारी समिती म्हणजेच वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षातील सर्वोच्च समिती आहे. डिसेंबर 1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात या समितीची स्थापना झाली होती. सी विजयराघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वर्किंग कमिटीला पक्षाची घटना, नियम आणि अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार असतो. याशिवाय. या समितीला अध्यक्षांना काढून टाकण्याचा किंवा नियुक्त करण्याचा अधिकार आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोण?

 १.मुकुल वासनिक – सदस्य

२.अशोक चव्हाण – सदस्य

३.अविनाश पांडे – सदस्य

४. रजनीताई पाटील – प्रभारी

५. माणिकराव ठाकरे – प्रभारी

६.चंद्रकांत हंडोरे – कायम निमंत्रित

७. प्रणिती शिंदे – विशेष आमंत्रित

८. यशोमती ठाकूर – विशेष आमंत्रित

जुन्या-नव्या चेहऱ्यांचे मिश्रण :

या समितीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (90) यांनाही समितीत कायम ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंग आणि कमलेश्वर पटेल, छत्तीसगडचे ताम्रध्वज साहू यांना कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गेंना आव्हान देणाऱ्या शशी थरूर यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. तसंच राजस्थानमधून सचिन पायलट, महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे अशा तरुण नेत्यांचीही वर्किंग कमिटीमध्ये वर्णी लागली आहे.

Tags

follow us