Download App

महिला अत्याचारावरून मुख्यमंत्र्यांना सुनावणाऱ्या मंत्र्याची गेहलोत सरकारमधून हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने राजेंद्र गुडा (Rajendra Guda)यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र गुडा यांनी शुक्रवारी 21 जुलै रोजी विधानसभेत आपल्याच सरकावर प्रश्न उपस्थित करत घेरले होते. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची राजस्थानशी तुलना करून ते म्हणाले की, राजस्थानमध्येही महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. सरकारने मणिपूरऐवजी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुडा यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना पत्र पाठवून राजेंद्र गुडा यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस केली. राज्यपालांनी गेहलोत यांची शिफारस मान्य केली आणि गुडा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. (Ashok Gehlot sacked Rajendra Gudha from the post of minister)

राजेंद्र गुडा यांनी आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले

राजेंद्र गुडा यांच्याकडे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), होमगार्ड आणि नागरी संरक्षण, पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद होते. बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ मणिपूरमध्ये व्हायरल झाला. या प्रकरणी देशभर संताप व्यक्त होतो. मणिपूरमध्ये काँग्रेस आमदारांनी महिलांची नग्न धिंड केल्याच्या विरोधात फलक घेऊन सभागृहात निषेध केला. यानंतर किमान उत्पन्न हमी विधेयकावर आपले म्हणणं मांडतांना राजेंद्र गुडा यांनी विधानसभेत आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले. महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राजेंद्र गुडा यांनी स्वतःच्या सरकारला अडचणीत आणले होते. गुडा म्हणाले की, राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे खरे आहे. सरकारने मणिपूरऐवजी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं गुडा म्हणाले.

गुडा यांच्या वक्तव्यावरून भाजपची गेहलोत सरकारवर टीका
राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांनीही राजेंद्र गुडा यांचा व्हिडिओ ट्विट करून गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते की, राजस्थानमध्ये बहिणी आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे वास्तव सरकारचे मंत्री राजेंद्र गुडा स्वतः सांगत आहेत. घटनेच्या कलम १६४(२) नुसार मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीच्या आधारावर काम करते. एखाद्या मंत्र्याचे विधान हे संपूर्ण मंत्रिमंडळाचे म्हणजेच सरकारचे विधान मानले जाते.
राजेंद्र राठोड पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत जी, आमचे नाही तर किमान तुमच्या मंत्र्याच्या वक्तव्याची तरी दखल घ्या. गृहमंत्री या नात्याने किमान कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तरी सांभाळा.

Tags

follow us