भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी दुपारी ब्रजराजनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. दास यांच्या छातीत 4-5 गोळ्या लागल्या असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे, गोळीबार करणाऱ्या एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप आरोपीने हल्ल्याचे कारण सांगितलेले नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नाबा दास कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ब्रजराजनगरला पोहोचले होते. गाडीतून खाली उतरताच एका एएसआय गोपालदासने नाबा दास यांच्यावर चार ते पाच राऊंड गोळीबार केला.
प्रत्यक्षदर्शी वकील राम मोहन राव यांनी सांगितले की, आरोग्यमंत्री नाबा दास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली. तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर एक पोलीस पळून जात असल्याचे आम्ही पाहिले.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले – हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे, मी ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी कामना करतो. गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
नाबा किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशातील झारसुगुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढून ते विजयी झाले. 2014 मध्येही काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते बिजू जनता दलाशी लढत सलग तिसऱ्यांदा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले. नाबा किशोर दास हे या भागातील प्रभावशाली नेते मानले जातात.
नाबा किशोर हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45.12 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांकडे सुमारे 15 कोटी किमतीची 70 वाहने आहेत, ज्यात 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ आहे.