Download App

उत्तर भारतात उष्णतेचा कहर; UP, बिहारमध्ये उष्माघाताने 48 तासांत तब्बल ९८ जणांचा मृत्यू

दिल्ली : उत्तर भारतात मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांत वाढलेल्या उष्णतेमुळे तब्बल 98 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील उत्तर प्रदेशात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मृत्यूंची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने डॉक्टरांची एक समिती गठीत केली असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (at least 98 people have died in Bihar and Uttar Pradesh due to severe heat in the last three days)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात मागील 4 दिवसांपासून ताप, श्वास घेण्यासाठी त्रास होणे आदी कारणांमुळे जवळपास 400 जणांना दाखल करण्यात आले आहे. यातील 15, 16 आणि 17 जूनला उष्माघातामुळे तब्बल 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक रुग्णांचे वय 60 पेक्षा जास्त होते. भारतीय हवामानशास्त्र डेटा (IMD) नुसार, बलियामध्ये शुक्रवारी (16 जून) कमाल तापमान 42.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.7 अंश जास्त आहे.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. जयंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा तीव्र उष्णता आहे, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाने लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. सर्व व्यक्तींना काही आजारांनी ग्रासले आहे. अशात तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. बहुतेक मृत्यू हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसारामुळे झाले आहेत, असेही जयंत कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक (CMS) दिवाकर सिंह यांनी सांगितले की, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयात पंखे, कुलर आणि एअर कंडिशनरची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने, आम्हाला आता स्ट्रेचरचा तुटवडा जाणवत आहे.”

बिहारमध्ये 44 मृत्यू :

उत्तरप्रदेशप्रमाणेच बिहारमध्येही परिस्थिती गंभीर आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे 24 तासांत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात किमान 18 ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट तर चार ठिकाणी उष्णतेची लाट आली असल्याची माहिती आहे. 44 मृत्यूंपैकी 35 लोकांचा मृत्यू राजधानी पाटणामध्ये झाल आहे, त्यापैकी 19 रुग्णांचा नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी पाटणामध्ये 44.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर शेखपुरा येथे 45.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाटण्यासह राज्यातील शाळांची सुट्टी 24 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मध्यप्रदेश शाळांमध्ये उन्हाळी सुट्ट्या वाढवल्या

शेजारील राज्यांमधील उष्णतेची लाट लक्षात घेता मध्य प्रदेश सरकारनेही सतर्कता म्हणून शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत वर्गात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Tags

follow us