Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर जगभरात टॅरिफ वॉर छेडले गेले आहे. यानंतर कॅनडाचा निर्णय एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, बाकीच्या देशांबाबतीत त्यांचे धोरण कायम आहे. याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी दिसली. ट्रम्प यांच्या रडारवर सध्या युरोपिय युनियन, चीन आणि भारत आहेत. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचे कनेक्शन हार्ले डेव्हिडसन या कंपनीशी सुद्धा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी या कंपनीच्या दुचाकीचे उदाहरण दिले होते. तसेच अमेरिका आता रेसिप्रोकल टॅरिफ लागू करणार असल्याचे सांगितले. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो देश अमेरिकेच्या वस्तूंवर जितके आयात शुल्क आकारील तितकेच शुल्क अमेरिका त्या देशाच्या वस्तूंवर आकारील. या पद्धतीचा कर कसा आहे याची माहिती देताना ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन (Harley Davidson) कंपनीचे उदाहरण दिले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले भारत आमच्याकडून जितका टॅक्स घेईल तितकाच टॅक्स आम्ही त्यांच्याकडून घेऊ. मला वाटतं की हे योग्य आहे. मला आठवतं हार्ले डेव्हिडसन कंपनी भारतात आपली वाहने विकू शकली नाही. कारण भारतात टॅक्स खूप जास्त होता. खरच भारतात टॅक्स खूप जास्त होता. कंपनीला त्याठिकाणी वाहनांचे उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले. टॅक्स पासून वाचण्यासाठी कंपनीने भारतातच युनिट सुरू केले. आता आम्ही देखील असेच करणार आहोत.
हार्ले डेव्हिडसन कंपनीने सन 2009 मध्ये भारतात दुचाकी विकण्यास सुरुवात केली होती. प्रीमियम सेगमेंट दुचाकीला त्यावेळी भारतात जास्त मागणी होती. त्यानंतर 2010 मध्ये कंपनीने आपली डीलरशिप देखील सुरू केली होती. कंपनीच्या बिल्ट युनिटच्या आयातीवर भारताकडून 100 टक्के टॅक्स आकारला जात होता. काही वर्षांनंतर कंपनीने हरियाणात आपला एक असेम्ब्ली प्लांट सुरू केला होता. या ठिकाणी street 500 आणि 720 सारखे मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली.
यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने भारतातून आपला व्यवसाय बंद करत असल्याची घोषणा केली. पण कंपनीने हिरो मोटोकॉर्प बरोबर भागीदारीत आपल्या दुचाकींची विक्री सुरू ठेवली. हार्ले डेव्हिडसन कंपनीवरील या जास्त कराचा मुद्दा ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात सुद्धा उचलला होता. आता ट्रम्प पुन्हा टॅरिफ वॉरची भाषा बोलू लागले आहेत. अशात भारत आता हार्ले डेव्हिडसन कंपनीच्या इम्पोर्टेड मॉडेलवर टॅक्स कमी करू शकतो. सध्या हिरो कंपनी बरोबर 2023 मध्ये हार्ले डेव्हिडसनने Harley Davidson X440 बाईक भारतात लाँच केली आहे. या दुचाकींची एक्स शोरुम किंमत 2 लाख 30 हजार रुपये आहे.
PM मोदीच करणार बांग्लादेशचा फैसला, अमेरिकेकडून फ्री हँड; ट्रम्प यांची मोठी घोषणा