कुणकुण लागताच ‘बंटी’ आऊट, ‘नीरज’ इन… शेवटच्या क्षणी भाजपनं नेहमीप्रमाणे पत्ता बदलाला…

Bankipur By-Election भल्या भल्या पत्रकार आणि रणनीतीकारांचे अंदाज चुकवत भाजपा कधी कोणता डाव टाकेल सांगता येत नाही.

Bankipur By-Election

Bankipur By-Election

Why BJP Change Candidate In Bankipur By-Election : राजकारणात शेवटच्या क्षणी खेळी बदलण्यात भाजपचा हातखंडा मानला जातो. अनेकदा पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकारांचे अंदाजही भाजपच्या निर्णयांपुढे फोल ठरतात. बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतही असाच एक अनपेक्षित निर्णय पाहायला मिळाला. उमेदवारी जाहीर करून अर्जही भरल्यानंतर अवघ्या 24 तासांत भाजपने उमेदवार बदलला आणि 32 वर्षीय सामान्य कार्यकर्ता नीरज कुमार सिन्हा यांच्यावर विश्वास दाखवला. मात्र,अचानक उमेदवार का बदलला?याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

बिहारमधील बांकीपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.  त्यासाठी भाजप सर्वात पहिले अभिषेक कुमार उर्फ बंटी यांना उमेदवारी जाहीर केली होती. एवढेच काय तर, त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला होता. मात्र, अवघ्या 24 तासांत अभिषेक यांनी ‘कौटुंबिक कारणांमुळे’ उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजपने 32 वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवार घोषित केले आहे. पण, या सर्व निर्णयामागे केवळ कौटुंबिक कारणे नसून मोठे राजकीय गणित असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अचानक उमेदवार का बदलला?

अभिषेक कुमार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रचारासाठी एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, अभिषेक कुमार यांचे आई-वडील चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले आहेत. त्यांच्या विरोधातील कागदपत्रे राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या गटाकडे असल्याची चर्चा होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर हा मुद्दा उचलण्याची तयारी विरोधकांनी केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. याची कुणकुण भाजप नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर पक्षाने संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपने याबाबत अधिकृतपणे अशी कोणतीही कारणे जाहीर केलेली नाहीत.

बिहार भाजपही नव्हती समाधानी?

प्रसारित वृत्तांनुसार, अभिषेक कुमार यांच्या उमेदवारीबाबत बिहार भाजपच्या कोअर कमिटीतील काही नेते आधीपासूनच साशंक होते. राज्य नेतृत्वाने सुचविलेल्या नावांऐवजी अभिषेक यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पक्षाने उमेदवार बदलत नीरज कुमार सिन्हा यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

कोण आहेत नीरज कुमार सिन्हा?

अभिषेक कुमार उर्फ बंटी यांच्या माघारीनंतर आता बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपने नीरज कुमार सिन्हा यांना उतरवले आहे. अवघ्या 32 वर्षांचे नीरज कुमार सिन्हा हे सध्या भाजपचे मंडलाध्यक्ष आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या नीरज यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यापासून राजकीय प्रवास सुरू केला. बूथ अध्यक्ष, मंडल सरचिटणीस आणि नंतर मंडलाध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. संघटनेतील सातत्यपूर्ण काम, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि पक्षनिष्ठा यामुळे भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, या निर्णयामुळे ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ ही भाजपची प्रतिमा अधोरेखित करण्याचाही प्रयत्न पक्षाने केल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोरांविरुद्ध थेट लढत

बांकीपूर पोटनिवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे. कारण या मतदारसंघातून जन सुराज पक्षाचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नीरज कुमार सिन्हा यांच्यासमोर थेट प्रशांत किशोर यांचे आव्हान असणार आहे. ही जागा यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जिंकली होती. परंतू, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यसभेवर जात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे.

बांकीपूरची पोटनिवडणुकीत भाजपने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलत संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न केला, अशी राजकीय चर्चा असली तरी यामागचे अधिकृत कारण पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, आता बांकीपूरची लढत अधिकच रंगतदार झाली आहे. कारण एका बाजूला भाजपचा 32 वर्षीय सामान्य कार्यकर्ता नीरज कुमार सिन्हा आहेत, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित न राहता, बिहारच्या आगामी राजकारणाची दिशाही ठरवणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version