Bihar Politics : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी साथ सोडल्यानंतरही सत्ताधारी जेडीयूला (JDU) झटका बसेल असे अंदाज व्यक्त केले जात असतानाच नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मास्टरस्ट्रोक हाणला आहे. माउंटेन मॅन म्हणून ओळखले जाणारे दशरथ राम मांझी (Dashrath Ram Manjhi) यांचा मुलगा आणि जावई यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात नितीश कुमार यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
दशरथ मांझी यांचे सुपुत्र भागीरथ आणि जावई मिथून मांझी यांना पक्ष प्रवेश नितीश कुमार यांनी घडवून आणला आहे. या मंचावरून असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला की खरे नेते तर दशरथ मांझी हेच होते. यावेळी जदयू नेत्यांनी जीतन राम मांझी यांच्यावर घणाघाती टीका केली. मुशहर समाजासाठी जीतन मांझी नाही तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काम केले आहे. दशरथ मांझी यांना खरा सन्मान नितीश कुमार यांनीच दिला.
मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात
तसे पाहिले तर मुशहर समाजाची बिहारमधील अनेक लोकसभा मतदारसंघात मोठी लोकसंख्या आहे. जीतन राम मांझी यांनी साथ सोडल्यामुळे नितीश कुमार टेन्शनमध्ये आहेत. दुसरे महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठे नेते साथ सोडत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
या परिस्थितीत जेडीयू डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहेत. जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुशहर समाजाचे रत्नेश सदा यांना मंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर दशरथ मांझी यांचे पुत्र आणि जावई या दोघांना पक्षात घेत नितीश कुमार यांनी डॅमेज कंट्रोल केले आहे. पण, या रणनितीचा किती परिणाम होईल हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.