Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी 6 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या शेवटी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं होतं मात्र त्यापूर्वी राहुल गांधी यांनी आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) संकुलात धरणे आंदोलन केले तेथून सुमारे नऊ तासांनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून 12 तासांत चार पत्रकार परिषदा घेण्यात आले तसेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, किरेन रिजिजू आणि रविशंकर प्रसाद यांनी स्वतंत्र निवेदने जारी करत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
भाजपकडून (BJP) सकाळी 10.07 वाजता संबित पात्रा (Sambit Patra) , दुपारी 1.21 वाजता सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) , दुपारी 4.07 वाजता प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari) आणि रात्री 9.44 वाजता पुन्हा सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि किरेन रिजिजू, तसेच माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही स्वतंत्र निवेदने जारी केली. त्यांनी एसआयआर आणि व्होट चोरी प्रकरणावर भाजपची बाजू मांडली. राहुल गांधी यांच्या मोर्च्यामुळे भाजपवर दबाव स्पष्टपणे दिसून येत होता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आकाशवाणी संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले, “माझ्या भारतासोबत जे काही केले गेले आहे, ते देशद्रोहासारखे आहे. मग ते नरेंद्र मोदी असोत, अमित शाह, ज्ञानेश कुमार किंवा मोहन भागवत कोणीही सुटू शकणार नाही.” असं राहुल गांधी म्हणाले होते.
लोकतंत्र के गद्दारो को बचाने के लिए बचे-खुचे लोकतंत्र को घसीटा गया है।
हिसाब होगा – एक भी देशद्रोही बख्शा नहीं जाएगा। https://t.co/QbngN1p9y6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2026
तर दुसरीकडे काँग्रेस सत्तांतर घडवून आणण्यासाठी आणि राहुल गांधींना पदावर बसवण्यासाठी एक सुनियोजित व प्रायोजित प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडून करण्यात आला. तर भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित दुसऱ्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, ज्या लोकांनी 5.8 कोटी रुपयांचे रेशन आणि 4.45 कोटी रुपयांची मनरेगा (MGNREGA) मजुरी हडपली, तेच लोक आता ‘मृत’ आणि ‘बनावट’ मतदारांच्या माध्यमातून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी संध्याकाळी झालेल्या तिसऱ्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी हे “खोटेपणाचे दुकान” चालवत आहेत. त्यांनी आरोप केला की, ‘एआय’ (AI) द्वारे तयार केलेल्या बनावट व्हिडिओचा वापर करून चुकीचा समज पसरवण्याचा आणि दिल्ली पोलिसांची बदनामी करण्याचा राहुल यांचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे.
भाजपच्या चौथ्या पत्रकार परिषदेत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकामुळे दिवसाचा हा सर्व बनाव पूर्णपणे उघड झाला आहे. त्रिवेदींनी आयोगाच्या निवेदनाचा हवाला दिला, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की काँग्रेस किंवा कोणत्याही विरोधी पक्षाकडून भेटीसाठी कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही.
