E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य

देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठे? ते येणार तरी कुठून? पंतप्रधान नरेंद्र मोदी एथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचे आवाहन करतात,

News Photo   2026 08 10T202822.522

E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य

केंद्र सरकारच्या एथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20)धोरणाचे समर्थन करताना भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. E20 धोरणावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य करताना त्यांनी, ‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?, असा सवाल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मध्य प्रदेशातील रीवा मतदारसंघाचे खासदार जनार्दन मिश्रा हे रीवा विमानतळावर आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित होते. रीवा ते कोलकाता विमानसेवेच्या प्रारंभानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी E20 पेट्रोलच्या विरोधात सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले.

E20 पेट्रोलबाबतच्या कथित डीपफेक आणि बदनामीकारक मजकुराविरोधात नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाची दिलासा

देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठे? ते येणार तरी कुठून? पंतप्रधान नरेंद्र मोदी एथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचे आवाहन करतात, तर त्यावर आंदोलन केले जाते. शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? पश्चिम आशियात युद्ध सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल घेऊन येणाऱ्या जहाजांना तब्बल 18 हजार किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत आहे,” असे मिश्रा म्हणाले.

भारताला पेट्रोलला पर्याय शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ब्राझीलचे उदाहरण दिले. “ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर एथेनॉलचा वापर केला जातो आणि त्यावर वाहनेही चालतात. भारतातही एथेनॉलच्या माध्यमातून वाहने चालवता येऊ शकतात,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, केंद्र सरकारकडून E20 धोरणाचे समर्थन करण्यात येत असून, वाहनांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. E20 पेट्रोलच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये वाहनांच्या इंजिनला गंज लागणे किंवा झीज वाढणे यासंदर्भात ठोस पुरावे आढळले नसल्याचा सरकारचा दावा आहे.

E20 पेट्रोलवरून नेमका वाद काय?

देशात सध्या E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20 टक्के एथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण. केंद्र सरकारकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच इंधनाचा पर्याय म्हणून एथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन दिले जात आहे.

मात्र, काही वाहनचालकांकडून E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. वाहनांच्या काही भागांना गंज लागणे, झीज वाढणे तसेच मायलेज कमी होणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. E20 विरोधात ऑनलाइन मोहिमाही सुरू करण्यात आली आहे.

विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते एका कारची पेट्रोलची टाकी उघडताना दिसत आहेत.

यावेळी राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “दाल में कुछ काला नहीं, पूरी की पूरी दाल ही काली है,” अशी टीका केली. तसेच E20 पेट्रोलचा मुद्दा मोठ्या पातळीवर उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळं एकीकडे सरकारकडून E20 हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे वाहनचालकांच्या तक्रारी आणि विरोधकांच्या आरोपांमुळे या धोरणावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे.

Exit mobile version