Budget 2024 Live Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.1) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. प्राप्तिकर सवलतीत काय बदल होतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी आयुष्यमान योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे सीतारामन यांनी घोषित केले आहे.
आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांसाठी ही घोषणा काहीशी निराशा देणारी आहे. सध्या 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. यावेळी ही मर्यादा वाढवली जाईल अशी आशा नोकरदार आणि कर भरणाऱ्यांना होती. मात्र, सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात कोणताही बदल करण्या आलेला नाही.
अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ कव्हर सर्व आशा, अंगणवाडी सेविकांसाठी वाढवण्यात आले आहे. याशिवाय सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केले जाईल असे सीतारामन यांनी सांगितले. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस दिली जाणार. मातृत्व आणि बालकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. पोषण 2.0 ची अंमलबजावणी जलद केली जाणार. आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाईल.
सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती बनल्या असून, येणाऱ्याकाळात 3 कोटी महिलांना लखपतीदीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या 83 लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे.
गेल्या 10 वर्षांत 30 कोटी मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना कर्ज देण्यात आल्याचे सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पिय भाषणात सांगितले. कर्जासोबतच मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 70 टक्के घरे दिल्याचेही यावेळी सीतारामन यांनी सांगितले.
मोदी सरकारने देशाला नवी दिशा आणि नवी आशा दिल्याचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट करोडो शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ 4 कोटी शेतकऱ्यांना दिला जात आहे. मोदींच्या कार्यकाळात आम्ही 300 विद्यापीठे स्थापन केली तसेच एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले आहे.
'गरीबांचे कल्याण, देशाचे कल्याण' हा मंत्र घेऊन मोदी सरकार काम करत आहोत. 'सबका साथ सबका विकास' या उद्देशाने केंद्र सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपनं सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. याशिवाय 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर भाजपचे लक्ष असून, त्यांच्या गरजा, आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
भाषणादरम्यान सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख करत 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मोदी सरकारच्या व्हिजनबद्दल सांगितले. मोदींच्या कार्यकाळातील गेली 10 वर्षे परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगत या काळात भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. 2014 मध्ये मोदींनी सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक कार्यक्रम व योजना जनतेसाठी राबवण्यात आल्याचे सीतारामन म्हणाल्या. सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर असून, 2047 पर्यंत आम्ही भारताला विकसित देश बनवू असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवा झाली आहे. यावेळी त्यांनी देशातील जनता आशावादी असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश पुढे जात आहे. 2014 मध्ये मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. या सर्व आव्हानांमधून मार्ग काढत भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचं सीतारामन म्हणाल्या.