Gautam Adani : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्योजक गौतम अदानी आणि (Gautam Adani) त्यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जीचं (Adani Green Energy) मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कंपनीने बुधवारी स्पष्ट केले आहे की अमेरिकेत जे लाचखोरीचे आरोप झाले आहेत ते सगळे निराधार आणि खोटे आहेत. अमेरिकी फेडरल करप्शन प्रॅक्टिस कायद्यांतर्गत आरोप झाल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या देखील पूर्णपणे चुकीच्या आहेत असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
उद्योग समुहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर यूएस डीओजे प्रॉसिक्यूशन किंवा यूएस एईसीच्या तक्रारीत अमेरिकी फेडरल करप्शन प्रॅक्टिस कायद्याचे उल्लंघन केल्याचे कोणतेच प्रकरण नाही. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आता या सर्व प्रकरणी अदानी ग्रुपने नेमकं काय म्हटलं आहे हे जाणून घेऊ या..
Gautam Adani Group: गौतम अदानी पुन्हा अडचणीत, बांगलादेशात ‘या’ डीलची होणार चौकशी
अदानी ग्रीन एनर्जीने म्हटलं आहे की, गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर लाचखोरीचे कोणतेच आरोप नाहीत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रॉसिक्यूशनमध्ये फक्त Azure आणि CDPQ ऑफिशियल्सवर लाचखोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अदानी उद्योग समुहातील कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर जे काही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते त्याच्या ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.
खरंतर न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने सुनावणी दरम्यान गौतम अदानींच्या कंपनीवर अमेरिकी गुंतवणुकीत फ्रॉड करण आणि सोलर एनर्जी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारताच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा आरोप ठेवला आहे. 2020 पासून 2024 पर्यंत सोलर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने भारतीय अधिकाऱ्यांना मोठी लाच देण्यात आल्याचे कोर्टाने लावलेल्या आरोपांत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात देशाचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत रोहतगी म्हणाले,की मी काही अदानी समुहाचा प्रवक्ता म्हणून समोर आलेलो नाही. या प्रॉसिक्यूशनमध्ये एकूण पाच आरोपांचा समावेश आहे. यामध्ये कलम 1 आणि 5 जास्त महत्वाचे आहेत. याच प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर कोणतेच आरोप नाहीत. या दोघांविरुद्ध करप्शन प्रॅक्टिस अॅक्ट आरोप देखील नाहीत. कलम 5 नुसार जे काही आहे त्यात हे दोघे नाही तर काही विदेशी लोकांची नावे आहेत.
संबंधित व्यक्तीने नेमकं काय केलं आहे याची स्पष्ट माहिती आरोपपत्रात द्यावी लागते. ज्या पद्धतीचे आरोप अदानींवर लावण्यात आले आहेत. आरोपपत्रात असं एकही नाव नाही. तसेच कोणत्या पद्धतीने लाच दिली गेली, कोणत्या अधिकाऱ्यांना लाच दिली याचीही कोणतीच माहिती या आरोपपत्रात दिलेली नाही. आरोपपत्रात ज्या कंपन्यांवर आरोप लावण्यात आले आहेत आता अदानी ग्रुपने सिद्ध करायला हवं की ते त्या लोकांशी संबंधित आहेत किंवा नाही, असे मुकूल रोहतगी यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची मोठी घोषणा, अदानी फाउंडेशनकडून 100 कोटी रुपये घेणार नाही, ‘हे’ आहे कारण
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांना अदानींच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अधिवेशनात गौतम अदानींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर गदारोळ वाढत गेला.