भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG च्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार, या योजनेचे सुमारे 7.5 लाख लाभार्थी एक सारख्याच मोबाईल क्रमांकावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक मोबाईल नंबरमधील सर्व 10 क्रमांक 9999999999 असे आहेत. याशिवाय मृतांच्या नावेही लाभ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या लेखापरीक्षणाच्या अहवालात कॅगने ही धक्कादायक माहिती दिली आहे. (CAG has made many shocking revelations regarding Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana)
विशेष बाब म्हणजे ज्या मोबाईल क्रमांकावरून सुमारे 7.5 लाख लोकांनी नोंदणी केली होती, तो क्रमांकही चुकीचा होता. त्या क्रमांकाचे सिमकार्ड नाही. अशाच आणखी एका प्रकरणाचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, सुमारे 1 लाख 39 हजार 300 लाभार्थी 8888888888 क्रमांकाशी जोडले गेले आहेत, तर 96,046 लाभार्थी 90000000 क्रमांकाशी जोडलेले आहेत. याशिवाय, असे सुमारे 20 क्रमांक देखील पुढे आले आहेत, ज्यांच्याशी 10,000 ते 50,000 लाभार्थी जोडलेले आहेत.
अहवालानुसार, या योजनेअंतर्गत उपचार घेतलेल्या लोकांपैकी 88,760 लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र अशा रुग्णांनाही उपचार मिळत असल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तींवर उपचाराचा दावा करणारी सर्वाधिक प्रकरणे देशातील पाच राज्यांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. याशिवाय कोणत्याही रुग्णाला एकाच वेळी अनेक रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते, अशी तफावतही या अहवालात आढळून आली आहे. सोबतच सुमारे 48,387 रुग्णांचे 78,396 दावे होते ज्यात दुसऱ्यांदा अॅडमिट झाल्याचा दिनांक हा आधी डिस्चार्ज होण्याच्या पूर्वीचा आहे.
कॅगचा हा लेखापरीक्षण अहवाल संसदेत मांडण्यात आल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले, की सरकार या योजनेतील संशयास्पद व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) चा वापर करत आहे. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण 24.33 कोटी कार्ड बनवण्यात आले आहे.