Download App

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

  • Written By: Last Updated:

CBI Inquiry against Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी हा आरोप केला होता. या आरोपानंतर मोईत्रा यांची इथिक्स कमिटीकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणात सीबीआयची (CBI) एंट्री झाली आहे. निशिकांत दुबे यांनी ही माहिती दिली.

‘ओबीसी आरक्षण घटनाबाह्य’ हायकोर्टात याचिका, सरकारला अखेरची संधी 

लोकपालांनी सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला आहे. दुबे यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या तक्रारीनंतर लोकपालांनी सीबीआयला तपासाचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा गहाण ठेवून मोईत्रा यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकणी लोकपालांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर त्यांनी याप्रकरणी मोईत्रा यांची तक्रारही केली. दुबे यांनी लोकपाल, लोकसभा अध्यक्ष आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांच्याकडे मोईत्रा यांच्याबद्दल तक्रार केली. दुबे यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन स्वतंत्र पत्रे लिहिली आहेत. अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी मोईत्रा यांच्या लोकसभेच्या लॉग इनसाठीच्या आयपी अड्रेसची तपासणी करावी. मोईत्रांचा लोकसभा लॉगिन आयडी आणि पासवर्ड इतर कोणी वापरत आहे का? याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होतं. अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

तसेच दर्शन हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना 2019 ची निवडणूक लढवण्यासाठी 75 लाख रुपये दिले होते. यासोबतच मोईत्रा यांना एक महागडा आयफोनही देण्यात आला होता. महुआ मोईत्रा यांना दिलेल्या सरकारी बंगल्याचे नूतनीकरणही हिरानंदानी यांनी केले होते, असे अनेक आरोप दुबे यांनी केले होते.

बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात आरोपांची चौकशी होईपर्यंत मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर दुबेंनी लोकपालकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, आता या प्रकणाचा तपास करणार असल्यानं मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली.

Tags

follow us