पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ऑफिसवर सीबीआयची छापेमारी, भ्रष्टाचार आणि ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणात मोठी कारवाई

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी राजबीर घुमन यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी देखील सीबीआयने झडती घेतली.

Untitled Design   2026 10 07T101314.688

Untitled Design 2026 10 07T101314.688

CBI raids Punjab Chief Minister Bhagwant Mann’s office : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगड येथील कॅम्प ऑफिसवर सीबीआयने अचानक छापेमारी केल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी राजबीर घुमन यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी देखील सीबीआयने झडती घेतली. भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि सरकारी कामांसाठी कथितपणे लाच घेतल्याच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआयने मंगळवारी राजबीर घुमन आणि इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय मंजुऱ्या, सरकारी टेंडर तसेच सरकारी धोरणांमध्ये बदल करून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आरोपींवर आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातील पदाचा कथित गैरवापर करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकांनी चंदीगड, मोहाली, गुरुदासपूर, लुधियाना, पटियाला, संगरूर आणि जालंधर यांसह विविध ठिकणी आरोपींशी संबंधित परिसराची झडती घेतली. या कारवाईदरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही

सीबीआयच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगडमधील कॅम्प ऑफिसमध्ये संध्याकाळी सुमारे सहा वाजता छापेमारी करण्यात आली. याच कार्यालयात राजबीर घुमन कथितरित्या सहआरोपींना भेटत असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर सीबीआयच्या एका पथकाने संगरूरमधील घराचोन या घुमन यांच्या गावातील त्यांच्या निवासस्थानाची देखील झडती घेतली. या प्रकरणाची सुरूवात अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या अहवालातून झाली. ईडीने कथित घोटाळ्याबाबत पंजाब पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पंजाब पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले.

न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करत पंजाब आणि चंदीगडमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या प्रकरणातील एफआयआरमध्ये राजबीर घुमन यांच्यासह नितीन गोहल, जितीन गोहल उर्फ राजा, रोमी राजा महाजन, बीर देविंदर आणि आर. एस. नागरा यांची नावे आहेत. याशिवाय काही अज्ञात सरकारी अधिकारी आणि खासगी व्यक्तींना देखील आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयच्या आरोपानुसार, नितीन गोहल हा कथित ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणातील मध्यस्थ म्हणून काम करत होता आणि त्याचे राजबीर घुमन यांच्याशी संपर्क होते.

राज्यात पावसाचा जोर ओसरला, ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण, काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता

त्याचा भाऊ जितीन गोहल याला घुमन आणि डॉ. रोमी महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप आहे. डॉ. रोमी महाजन यांनी कथितपणे घुमन यांच्यासोबत काम करत नियुक्त्या आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये समन्वय साधल्याचा आरोप आहे. तर बीर देविंदर हा आम आदमी पक्षाशी संबंधित युवा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सीबीआयच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सरकार आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Exit mobile version