लग्नसराईच्या तोंडावर काश्मीरमध्ये मटण संकट गडद; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी पंजाब सरकारकडे घेतली धाव
राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधून काश्मीरकडे येणाऱ्या पशुधन ट्रकांकडून पंजाबमध्ये काही कंत्राटदारांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल केले जात आहे.
Omar Abdullah approached the Punjab government : काश्मीरची ओळख असलेल्या बहुपदरी वाझवान जेवणावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. बाहेरच्या राज्यांतून होणार मटणाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने खोऱ्यातील लग्नसराईवर त्याचा थेट परिणाम होत आहे. मटण व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधून काश्मीरकडे येणाऱ्या पशुधन ट्रकांकडून पंजाबमध्ये काही कंत्राटदारांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल केले जात आहे. यामुळे मटण वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले असून अनेक व्यापाऱ्यांनी पुरवठा थांबवला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या आरोपानुसार, पशुधन वाहून नेणाऱ्या प्रत्येक ट्रककडून पंजाबमधील काही कंत्राटदार 20 ते 25 हजार रुपये ट्रान्झिट फी च्या नावाखाली वसूल करत आहेत. राजस्थान, हरियाणा किंवा गुजरातमध्ये जनावरे खरेदी करतानाच 4 टक्के कर भरावा लागतो. त्यानंतर देखील पंजाबमध्ये अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपी चेतनच्या वर्गमित्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मटण व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, लग्नसराईच्या हंगामात दररोज 12 ते 14 कोटी रुपयांचे पशुधन या राज्यांतून काश्मीरमध्ये आणले जाते. मात्र गेल्या आठवडाभरापासून हा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या पत्रात पंजाब सरकारला अनधिकृत वसुली होऊ नये, यासाठी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मटण व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आठवडाभरापूर्वी पत्र पाठवले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांसमोर संपाचा पर्याय उरलेला असल्याचे ते सांगत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दरवर्षी सुमारे 60 हजार टन मटणाची गरज असते.मात्र स्थानिक उत्पादन केवळ 30 हजार तणांच्या आसपास आहे. उर्वरित जवळपास 50 टक्के मटण राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधून आयात केले जाते. अशा परिस्थितीत बाहेरील राज्यांतून होणार पुरवठा अचानक बंद झाल्याने मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात वाझवान हा काश्मिरी विवाहसोहळ्यांचा अविभाज्य भाग मानला जात असल्याने नागरिक आणि व्यावसायिक दोघांची देखील चिंता वाढली आहे.
व्यापारी हिलाल अहमद यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील उपलब्ध मटणाचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मागणी आणि उपलब्धता यामधील तफावत इतकी मोठी आहे की सध्याच्या परिस्थितीत ती भरून काढणे अत्यंत कठीण आहे.