Chandrayaan-3 First Video : भारताची चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. रविवारी रात्री 11 वाजता त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला. आता तो टप्पा पार केल्यानंतर चांद्रयानाने चंद्राचे छायाचित्र पाठवले आहे. इस्रोने ट्विट करून चंद्राचा एक अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
चंद्राचे पहिले चित्र कसे आहे?
इस्रोने ट्विट करून लिहिले की, चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असताना चंद्र काहीसा असा दिसत होता. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चंद्र खुप सुंदर दिसत आहे. पांढर्या रंगाचा हा विशाल उपग्रह लोकांना अगदी जवळून दाखवण्यात आला आहे.
23 ऑगस्ट चांद्रयान 3 ची अग्निपरीक्षा
आता 23 ऑगस्ट ही भारताच्या चांद्रयानसाठी सर्वात महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे आहे. गेल्या वेळी भारताचे चांद्रयान 2 या टप्प्यावर अयशस्वी झाले होते. पण आता चांद्रयान 3 पूर्ण तयारीनिशी चंद्राकडे वाटचाल करत आहे.
चांद्रयान आता चंद्राभोवती 170×4313 किलोमीटर कक्षेमध्ये फिरत आहे. हे चांद्रयान आता या कक्षेमध्ये चंद्राभोवती फेरी मारणार असून 9 ऑगस्ट रोजी ते इस्त्रोच्या बंगळुरु येथील सेंटरवरुन आणखी आतल्या कक्षेत पुढे पाठवले जाईल.
मागील चुकांमधून धडा घेत यावेळी 500×500 मीटरच्या छोट्या जागेऐवजी, लँडिंग साइटसाठी 4.3 किमी x 2.5 किमीची मोठी जागा निवडली आहे. म्हणजेच यावेळी लँडरला अधिक जागा मिळेल आणि तो सॉफ्ट लँडिंग सहज करू शकेल.
https://twitter.com/chandrayaan_3/status/1688215948531015681?s=20
यावेळी इंधन क्षमता देखील वाढवण्यात आली आहे जेणेकरून लँडरला लँडिंगची जागा शोधण्यात अडचण येत असेल तर ते सहजपणे वैकल्पिक लँडिंग साइटवर हलवता येईल. चांद्रयान-3 सुमारे 615 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आले आहे. जानेवारी 2020 च्या एका अहवालात, इस्रोच्या अध्यक्षांनी मिशनसाठी लँडर रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलची किंमत सुमारे 250 कोटी रुपये असेल, तर प्रक्षेपणासाठी 365 कोटी रुपये खर्च येईल असे नमूद केले होते.