CJP forms its National Working Committee : दिल्लीतील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुढील महिन्यासाठी एक मोहिम जाहीर केली आहे. CJP कडून देशव्यापी ‘क्या बोलती पब्लिक’ हे मोहित आखली असल्याची सीजेपीचे संस्थापक प्रमुख अभिजित दीपके ( Abhijeet Dipke) यांनी दिली. त्याच बरोबर सीजेपीने राष्ट्रीय कार्यकारिणीची जाहीर केलीय.
11 जणांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
कॉकरोच जनता पार्टीने आज आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या रचनेला ‘ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अँड नॅशनल एक्सपान्शन आर्किटेक्चर’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एकूण 14 पदे तयार करण्यात आली असून, 11 जणांकडे विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. अभिजीत दीपके यांची संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्याकडे सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजिंक्य शिंदे यांच्याकडे राष्ट्रीय संघटना प्रभारी, तर दीपक बालियान यांच्याकडे राष्ट्रीय संघटना सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफरीन नवाज यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय रेड्डी मलंगी यांच्याकडे मीडिया विभागाची, तर रत्ना सिंह यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी देण्यात आली आहे. वैष्णवी गौर यांच्याकडे संशोधन आणि धोरण विभागाची, तर रोहन देशपांडे यांच्याकडे तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. योगेश इंगले यांच्याकडे संघटनेच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
चार झोनल हेडचीही नियुक्ती
पक्षाने चार झोनल हेडचीही नियुक्ती केली आहे. उत्तर विभागाची जबाबदारी दीपक बालियान, तर दक्षिण विभागाची जबाबदारी विजय रेड्डी मलंगी यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्व आणि ईशान्य विभागाची जबाबदारी अंकित भारद्वाज यांच्याकडे, तर पश्चिम विभागाची जबाबदारी योगेश इंगले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केले आहे की, पुढील सहा महिन्यांत राज्यांमध्ये समन्वय समित्या स्थापन केल्या जातील. त्याचबरोबर लोकसभा आणि शहर पातळीवरही समन्वय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या 11 जणांव्यतिरिक्त सध्या अन्य कोणत्याही व्यक्तीची पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही.
पाच प्रमुख मुद्द्यांवर आवाज उठवला जाणार
‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेत पहिला मुद्दा शिक्षणाचा असणार आहे. देशातील न्यायव्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक करणे हे पक्षाचे दुसरे महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे दीपके यांनी सांगितले. याशिवाय रोजगाराचा मुद्दाही पक्षाच्या अजेंड्यावर असणार आहे. देशातील 35 वर्षांखालील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा दीपके यांनी केला. सुमारे 60 टक्के लोकांकडे रोजगार नाही, तर ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांचे वेतन इतके कमी आहे की घर चालवणेही कठीण होत आहे. पदवीधर तरुणही बेरोजगार असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
