काल जंतर-मंतरवर आज मोदींसोबत दिलखुलास भेट; पवारांच्या ’24 तासां’तील दोन फोटोंमध्ये काय दडलंय?

शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यात अवघ्या 24 तासांत समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना नवे वळण दिले आहे.

Letsupp Image   2026 07 22T125502.861

Letsupp Image 2026 07 22T125502.861

Political Meaning Of Sharad Pawar PM Modi Meet’s : राजकारणात योगायोगांनाही अनेकदा अर्थ असतो, असे म्हटले जाते. त्यात शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात अवघ्या 24 तासांत समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना नवे वळण दिले आहे. एका बाजूला काल (21 जुलै) शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पवार हे विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून दिसले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासात पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यानचे हसत-खेळत संवादाचे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

धर्मेंद्र प्रधानांवर मोदींचा ‘फुल ट्रस्ट का?’; राजीनामा न घेण्यामागची 5 मोठी कारणं अन् 12 वर्षांचं कनेक्शन…

फोटोमधील ‘बॉडी लँग्वेज’ही चर्चेचा विषय

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील संवादाचे जे फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये दोन्ही नेते अत्यंत सहजपणे चर्चा करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळेही या भेटीत उपस्थित होत्या. राजकीय वर्तुळात केवळ भेटच नव्हे, तर त्या भेटीतील सहजता आणि हसतमुख वातावरणही चर्चेचा विषय ठरला आहे.

NDA प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा?

गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. पक्षातील काही नेते महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या भेटी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भविष्यात एनडीएचा भाग होऊ शकते, असे तर्क सातत्याने लावले जात आहेत. या चर्चांमध्ये कोणतीही अधिकृत पुष्टी नसतानाही आजची मोदी-पवार भेट आणि त्यातील मैत्रीपूर्ण वातावरणामुळे त्या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळाल्याचे चित्र आहे.

भेट नेमकी कशासाठी? पत्र समोर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजच्या भेटीवेळी पंतप्रधान मोदींना एक पत्र दिले. महाराष्ट्र कृषी आणि जलक्षेत्र संबंधित शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीबद्दलचे हे पत्र असल्याचे समजते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत, चौकशीतील विलंब टाळणे आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

सिंचन आणि पाणी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, सिंचन योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावे आणि रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करून थांबू नये, तर प्रत्येक शेतकऱ्याला MSP चा कायदेशीर अधिकार मिळावा, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.  याशिवाय, पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच बनावट/निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, संसदीय विषय, विकासकामे किंवा इतर कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबाबत पंतप्रधान कार्यालय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे भेटीचा राजकीय अर्थ लावण्यापेक्षा तिच्या अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

शरद पवारांची राजकीय शैली वेगळी

शरद पवार हे विरोधी पक्षात असले तरी सत्ताधारी नेत्यांशी संवाद कायम ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक पंतप्रधान आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची भेट घेणे हे त्यांच्या राजकीय शैलीत नवे नाही. मात्र, या भेटीचे महत्त्व वाढवणारी बाब म्हणजे तिची वेळ. एकीकडे केंद्र सरकारविरोधातील आंदोलनाला पाठिंबा आणि दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांशी सौहार्दपूर्ण भेट, या दोन घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुढील काही दिवस महत्त्वाचे

संसदेचे अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थंच्या काही ठिकाणच्या प्रलंबित निवडणुका आणि आगामी राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे. अशा वेळी शरद पवारांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे बारकाईने पाहिले जात आहे. त्यामुळे आजची भेट ही केवळ औपचारिक होती की भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळू शकते. सध्या मात्र एवढे निश्चित आहे की, शरद पवारांच्या एका दिवसातील दोन वेगवेगळ्या राजकीय चित्रांनी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतच्या राजकीय चर्चांना नवा विषय दिला आहे.

(डिस्क्लेमर : शरद पवारांचा एनडीएमध्ये प्रवेश किंवा कोणतेही नवे राजकीय समीकरण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या बातमीत मांडलेले मुद्दे सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या आणि उपलब्ध घडामोडींच्या विश्लेषणावर आधारित आहेत.)

Exit mobile version