Congress Party Politics : कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार (DK Shivkumar) आणि शशी थरुर भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. शिवकुमार यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आणि थरुर यांच्याकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे काँग्रेस पक्षात वेगळ्याच (Congress Party) चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपला दक्षिण भारतात विस्तार करण्यासाठी मोठा जनाधार असणाऱ्या नेत्यांची गरज आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आहे परंतु पक्षात सगळेच आलबेल आहे अशी परिस्थिती राहिलेली नाही. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार खरंच भाजपात जाण्याची तयारी करत आहेत का? राजकीय वर्तुळात याबाबतीत तर्क लढवले जात आहेत. शिवकुमार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यांना काँग्रेसचे संकटमोचक असेही म्हटले जाते.
राज्याचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची सुप्त इच्छा आहेच. काँग्रेस नेतृत्वाने सुद्धा त्यांना तसा विश्वास दिला होता. निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्री निवडीत विलंब झाला होता. सिद्धरामय्या आणि शिवकुमार दोघेही प्रबळ दावेदार होते. दोन्ही नेत्यांना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती. शिवकुमार नाराज होऊ नयेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचाही निर्णय झाला होता.
परंतु आता त्यांच्या बाबतीत अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. यामागे काही करणेही आहेत. एक तर त्यांनी प्रयागराज येथे महाकुंभात (Prayagraj Mahakumbh 2025) स्नान केले तसेच येथील व्यवस्थेचे कौतुक केले. दुसरे म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त कोयंबतूर येथे ईशा फाउंडेशनच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील उपस्थित होते. या घटना शिवकुमार यांच्यावर काँग्रेस नेतृत्वाची खप्पा मर्जी होण्यास पुरेशा आहेत. पण दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर दबाव म्हणूनही या घटनांकडे पाहिले जात आहे. तसेच राहुल गांधी यांना सूचक इशारा म्हणूनही शिवकुमार यांच्या या राजकारणाकडे पाहिले जात आहे.
दुसरीकडे शिवकुमार यांनीही राजकारणात सुरू असलेल्या या चर्चांचे खंडण केलेले नाही. त्यामुळे आगामी काळात कर्नाटक काँग्रेसमध्ये काहीही घडू शकते अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
केरळ मधील तिरुवनंतपुरम मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेत आलेले खासदार शशी थरुर यांच्यावर वरिष्ठ नेते नाराज आहेत असे दिसत आहेत. काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात जाऊन थरुर यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. यामुळे पक्ष आणि थरुर यांच्यातील अंतर अधिकच वाढले. काँग्रेसमधील वरिष्ठांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर शिक्कामोर्तब केलेले असताना त्यांचा आदेश डावलून थरूर निवडणूक लढतात ही गोष्ट नेतृत्वाला सहन होण्यासारखीच नव्हती. यानंतर शशी थरुर यांना पक्षात साइडलाइन केले जाऊ लागले.
निवडणुकीनंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये, माजी आमदारासह 5 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
यानंतर आणखी एक असाच प्रसंग घडला. थरुर यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या बरोबरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे कौतुकही केले होते. या गोष्टी काँग्रेस नेतृत्वाला खटकणाऱ्याच होत्या. केरळमध्ये भाजपकडे जनाधार असलेला एकही मोठा नेता नाही. त्यामुळे भाजपकडून थरुर यांच्यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे. पण थरुर यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिले. पक्षात त्यांना सध्या कोणतीच भूमिका दिली जात नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. तसेच त्यांच्या गृह राज्यातही त्यांना कोणतीच जबाबदारी दिली जात नाही.