Congress leader Rahul Gandhi on sir attack bjp voter deletion : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘एसआयआर’ अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रक्रियेचा थेट संबंध मतचोरीशी जोडत राहुल गांधी यांनी काही कागदपत्रेही सोशल मीडियावर सार्वजनिक केली आहेत. राहुल गांधींचा आरोप आहे की, ज्या-ज्या ठिकाणी SIR प्रक्रिया राबवली जात आहे, त्या-त्या ठिकाणी मतदारांची नावे योजनाबद्ध पद्धतीने मतदार यादीतून वगळली जात आहेत. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे की, ‘जिथे जिथे SIR, तिथे तिथे मतचोरी. गुजरातमध्ये SIR च्या नावाखाली जे सुरू आहे, ती कोणतीही साधी प्रशासकीय प्रक्रिया नसून, ही सुनियोजित, संघटित आणि धोरणात्मक मतचोरी आहे.’
राहुल गांधी यांनी असा आरोपही केला आहे की, एकाच नावावरून हजारो आक्षेप नोंदवले गेले असून, विशिष्ट वर्गातील मतदारांची तसेच काँग्रेस समर्थक बूथवरील मतदारांची नावे यादीतून काढली जात आहेत. ‘जिथे भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसतो, तिथे मतदारच सिस्टीममधून गायब केले जातात,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आळंद आणि राजूर या भागांचा संदर्भ देत, हा पॅटर्न आधी तिथे दिसला असून आता तीच ‘ब्लूप्रिंट’ गुजरात, राजस्थान आणि ज्या-ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया राबवली जात आहे, तिथे लागू केली जात असल्याचा दावा केला आहे.
जहाँ-जहाँ SIR, वहाँ-वहाँ वोट चोरी।
गुजरात में SIR के नाम पर जो कुछ किया जा रहा है, वह किसी भी तरह की प्रशासनिक प्रक्रिया नहीं है – यह सुनियोजित, संगठित और रणनीतिक वोट चोरी है।
सबसे चौंकाने वाली और ख़तरनाक बात यह है कि एक ही नाम से हज़ारों-हज़ार आपत्तियाँ दर्ज की गईं।
चुन-चुनकर… https://t.co/LC9i5DP44y
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 24, 2026
निवडणूक आयोगावर थेट टीका करत राहुल गांधी म्हणाले की, ‘SIR प्रक्रियेला ‘एक व्यक्ती, एक मत’ या घटनात्मक अधिकाराचा बळी देणाऱ्या शस्त्रात रूपांतरित करण्यात आले आहे. जनता नाही तर भाजप ठरवेल की सत्तेत कोण राहणार.’ सर्वात गंभीर बाब म्हणजे, निवडणूक आयोग हा आता लोकशाहीचा रक्षक न राहता, या कथित मतचोरीच्या प्रक्रियेतील सहभागी घटक बनत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, गुजरात काँग्रेसने जिल्ह्यानुसार याद्या ‘X’ वर प्रसिद्ध केल्या असून, राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उघड केल्यानंतर भाजपने आता ‘निवडणूक चोरी’चे पुढच्या टप्प्याचे मॉडेल अवलंबल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, नियमानुसार SIR प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी जाहीर करून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी 18 जानेवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. 15 जानेवारीपर्यंत अत्यल्प आक्षेप नोंदवले गेले होते. मात्र त्यानंतर अचानक एका ठराविक कटाअंतर्गत लाखो आक्षेप, म्हणजेच फॉर्म 7 दाखल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र राहुल गांधींच्या या आरोपांमुळे SIR प्रक्रिया आणि मतदार यादी पुनरिक्षणावरचा राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
