दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेमध्ये बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांवरुन मोदींवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नुकताच हिंडेनबर्ग या संस्थेने उद्योगपती अंदानींवर जो आरोप केला आहे, त्यावरुन निशाणा साधला आहे. याविषयावर बोलत असताना त्यांनी संसदेमध्ये अदानी (Adani) व मोदी यांचे फोटो दाखवत या दोघांचे संबंध काय असेही विचारले. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या कोळश्याच्या खाणीवरुनही त्यांनी मोदी व अदानींच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी हे संसदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर बोलत होते.
तसेच जीव्हीकेवर दबाव टाकून त्यांनी मुंबई विमानतळाचे काम हे अदानींना दिल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्ट दिले असून या कामात सीबीआय व ईडीचा वापर करुन जीव्हीकेवर दबाव टाकला. अदानी हे 2014 साली संपत्तीच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर होते. काही वर्षातचे ते दुसऱ्या क्रमांकावर आले, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. अदानी व मोदी यांनी गेल्या आठ वर्षात किती वेळा एकत्र प्रवास केला, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. अदानींची गेल्या आठ वर्षातील संपत्ती वाढ होण्यामध्ये मोदी व केंद्र सरकारचा हाथ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच अग्नीवीर ही योजना देशावर थोपवली आहे. ही योजना आर्मीची नसून आरएसएस व मोदींची आहे. ही योजना राबवण्यापाठीमागे अजित डोवालांचा हाथ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी भाजपच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी जे आरोप करत आहेत, त्याच्या पुरावा देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या अनेक मंत्र्यांनी केली. यानंतर आगामी काळात काँग्रेस अदानी व मोदींच्या संबंधावरुन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.