मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी मैदानात; दिल्लीत बैठक संपन्न, महत्वाचे पाच मुद्दे ठरले

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २३ पक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले.

India Allience

मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी मैदानात; दिल्लीत बैठक संपन्न, महत्वाचे पाच मुद्दे ठरले

देशातील महत्वाच्या पाच राज्यातील निवडणुकी (India) झाल्यानंतर आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला आम आदमी पक्ष आणि नुकताच इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला डीएमके सोडता इतर सर्व विरोधी पक्ष उपस्थित होते. दरम्यान, झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेल्या प्रमुख मागण्या सांगितल्या.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

इंडिया आघाडीची बैठक पार पडली, यामध्ये २५ पक्ष सहभागी झाले होते. त्यांनी सगळ्यांनी त्यांची मतं मांडली. आम्ही पाच मुद्दे काढले आहेत. त्यावर आमची सहमती झाली आहे. या पाच मुद्द्यांवर आम्ही काम करणार आहोत, लढणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. असं म्हणत कुठल्या पाच मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची माहिती मल्लिकार्जुन खरगेंनी दिली.

आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन हे दोन्ही नेते ऑनलाइन उपस्थित होते. त्यांचीही याबाबत सहमती झाली आहे अशी माहिती मल्लिकार्जुन खरगेंनी दिली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २३ पक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले. आघाडी फुटीच्या प्रश्नावर बोलताना जयराम रमेश यांनी विरोधकांची आघाडी एकत्रित असल्याचं स्पष्ट केलं.

कुठल्या मुद्द्यांवर एकमत?

1) आम्ही भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार आहोत. व्होट चोरी आणि निवडणुकींमधली पारदर्शकता हा त्याचा विषय आहे. SIR, मतदार याद्यांचे घोळ, तसंच निवडणूक प्रक्रियेतला गोंधळ हे मुद्देही त्यात असणार आहेत.

2) लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट’ परीक्षांचे पेपर फुटतात. जे काही घडलं आहे ती परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या कार्यकाळात नीट आणि सीबीएसई परीक्षांमध्ये लाखो युवकांसह विश्वासघात झाला आहे, तरुण रस्त्यावर आले आहेत.

3) वर्तमानातली देशाची आर्थिक स्थिती ही अतिशय गंभीर आहे. बेरोजगारी वाढते आहे, महागाई वाढते आहे आणि शेतकऱ्यांचे मुद्दे यावर आम्ही आवाज उठवणार आहोत. तसंच जनहिताचे अन्य विषयही आम्ही चर्चिले आहेत. आम्हाला वाटतं आहे की सरकारने आता या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे.

4) इंडिया आघाडीचे सगळे पक्ष दर दोन महिन्यांनी बैठक करतील. यापुढची बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबाद या ठिकाणी आयोजित केली जाईल.

5) पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान समन्वय बैठका आयोजित केल्या जातील. या सगळ्या विषयांवर आमची सहमती झाली आहे.

Exit mobile version