Download App

Telangana Election Result काॅंग्रेसचे रिसाॅर्ट पाॅलिटिक्स; आमदारांना नेण्यासाठी तीन बस तयार

  • Written By: Last Updated:

हैदराबाद : Telangana Election Result 2023 तेलंगणामध्ये बीआरएसचा (BRS) धुव्वा उडविल्यानंतर आता सत्ता स्थापनेपूर्वी काॅंग्रेस पक्षाने ( Congress) सावध पवित्रा घेतला आहे. तेलंगणात (Telangana) ११९ पैकी ६५ जागांवर आघाडी घेत काॅंग्रेसने अनेकांना चकीत केले. बीआरएसला धक्का दिल्यानंतर आपल्या नवीन आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठीच्या हालचाली पक्षाने सुरू केल्या आहेत. यासाठीची जबाबदारी साहजिकच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना देण्यात आली आहे. या आमदारांना आता कर्नाटकात हलविण्यात येणार आहे.

‘BRS’ची मोटार तेलंगणातच रुतली; आता महाराष्ट्रात भालके, धोंडगे, शेलार, राठोडांचे काय होणार?

डी. के. शिवकुमार हे रिसाॅर्ट पाॅलिटिक्समध्ये वाकबगार आहेत. कर्नाटकातील काॅंग्रेस- जनता दल यांचे सरकार वाचविण्यासाठी त्यांनी बऱ्याच करामती केल्या होत्या. काॅंग्रेस आमदारांची शिकार रोखण्यासाठी त्यांना हलविणे गरजेचे वाटल्याने त्यांना आता तीन बसमधून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारांनी विजयाचे प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर त्यांना थेट बसमध्ये चढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवकुमार यांनी तेलंगणातील निवडणुकीची जबाबदारी सांभाळली होती. पक्षाच्या उमेदवारांना सर्व ती मदत करण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. त्यांच्या सोबत महाराष्ट्राती नेते आणि प्रदेश काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणात निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते.

 

तेलंगणात सत्ताबदल होणार, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलनी व्यक्त केला होता. के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने अनेक योजना राबविल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर पक्ष विस्तार करण्याची त्यांची मनीषा होती. पण स्वराज्यातच त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या स्वप्नांना ब्रेक बसला आहे. चंद्रशेखर राव हे संगारेड्डी मतदारसंघात पिछाडीवर आहेत. त्यांच्या पक्षासाठी हा फारच मोठा धक्का आहे. केसीआर यांच्या गुलाबी वादळाचा धसका महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात होते. स्वतः के. चंद्रशेखर राव हे औरंगाबाद येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. आता ते सारेच थंडावणार आहे. भगीरथ भालके यांच्या पक्ष प्रवेशासाठी राव यांनी सोलापूर आणि पंढरपूरमध्ये मोठे  शक्तिप्रदर्शन केले होते. आता त्यांच्या पक्षात गेलेले अनेक नेते परत फिरतात की बीआरएसमध्येच राहतात, याची उत्सुकता असणार आहे.

तेलंगणामधील पराभव बीआरएसने स्वीकारला असून केसीआर यांचे चिरंजीव के. टी. रामाराव यांनी जनतेने दिलेल्या कौलाचा आपण स्वीकार करत असल्याची प्रतिक्रिया दिली.

 

Tags

follow us