Rajnath Singh Jammu Kashmir : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला (India Pakistan Ceasefire) असला तरी तणाव अजून निवळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) देखील जम्मू काश्मिरात दाखल झाले. येथे त्यांनी सैन्यातील जवानांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांबाबत मोठे वक्तव्य केले. पाकिस्ताकडील अणुबॉम्ब आयएईएच्या देखरेखीखाली आणला पाहिजे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात नक्कीच खळबळ उडणार आहे.
पाकिस्तानकडून कोणतीही कुरापत काढली जाणार नाही या मुद्द्यावर दोन्ही देशांत सहमती झाली आहे. पण जर असं काही घडलं तर मग मात्र त्याचा दूरगामी परिणाम होतील असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. मी जगासमोर सांगू इच्छितो की पाकिस्तानकडील अण्वस्त्रे इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीने स्वतःच्या देखरेखीखाली घ्यायला हवीत. आता आम्हाला त्यांच्याकडून होणाऱ्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलची काहीही चिंता नाही. पाकिस्तानकडून एटमची धमकी देण्यात आली आहे. तर मग अशा बेजबाबदार देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? असा सवाल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरही त्यांनी भाष्य केलं. अतिरेक्यांनी निर्दोष लोकांना त्यांचा धर्म विचारुन मारलं होतं. यानंतर तुम्ही (भारतीय सैन्य) जे प्रत्युत्तर दिलं हे सगळ्या जगानं पाहिलं. दहशतवाद्यांनी भारतीयांना त्यांचा धर्म पाहून मारलं आम्ही मात्र अतिरेक्यांना त्यांचं कर्म पाहून मारलं असे राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील बादामी सैन्य छावणीत पोहोचले होते. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानकडूनही गोळीबार झाला होता. ड्रोन्सच्या मदतीने हल्ल्यांचा प्रयत्न झाला होता. राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानच्या गोळीबाराच्या ठिकाणांची पाहणी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्येच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी यावेळी काही तरी मोठं करणार असा निश्चय मोदींनी सौदीतच घेतला होता. ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी मोदींनी भारतात परतल्यानंतर 45 हून अधिक गुप्त बैठका घेतल्या. ज्यामध्ये एनएसए, सीडीएस आणि तिन्ही लष्कर प्रमुख, आयबी आणि रॉ प्रमुख सहभागी होते. या बैठका पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकांव्यतिरिक्त होत्या. ज्या एका गुप्त ठिकाणी पार पडल्याचे सांगितले जात आहे.
Operation Sindoor : सौदीतच ठरला इस बार बडा करेंगेंचा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्..