Delhi-Chennai IndiGo flight diverted to Hyderabad : दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणादरम्यान एका प्रवाशाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आग लागल्याने विमानामध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर विमान हैदराबादकडे वळवण्यात आले. हे विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. त्यानंतर प्रवाशांना चेन्नईला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही घटना 11 ऑक्टोबर रोजी इंडिगोच्या 6E 6115 या विमानात घडली. विमानात धुर निघत असल्याची माहिती मिळताच केबिन क्रूने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून विमान हैदराबादला उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रवाशाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून निघाला धूर
दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या बॅगमधील वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर निघू लागला. पॉवर बँकला आग लागल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इंडिगोने आपल्या अधिकृत निवेदनात संबंधित उपकरणाची ओळख स्पष्ट केलेली नाही. एअरलाइनने केवळ एका इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर निघाल्याची पुष्टी केली आहे. विमानात धूर दिसताच केबिन क्रूने तातडीने परिस्थिती हाताळली. त्यानंतर वैमानिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विमान हैदराबादकडे वळवण्याचा निर्णय घेतला. विमानाने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केले.
इंडिगो फ्लाइट में पावर बैंक में लगी आग, इमरजेंसी लैंडिंग
खबरों के मुताबिक, दिल्ली से चेन्नई जा रही इंडिगो की फ्लाइट 6E6115 को एक यात्री के पावर बैंक में आग लगने के बाद शमशाबाद के राजीव गांधी इंटरनेशनल एयरपोर्ट पर इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी.
@IndiGo6E
#indigo #indigoflight #emergencylanding— zingabad (@zingabad) October 11, 2026
प्रवाशांना चेन्नईला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था
हैदराबादमध्ये विमान उतरवल्यानंतर प्रवाशांचा पुढील प्रवास पूर्ण करण्यासाठी इंडिगोकडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना अल्पोपाहार दिला जात असून, पुढील प्रवासाबाबत आवश्यक माहितीही पुरवली जात असल्याचे एअरलाइनने सांगितले.
या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवासी आणि विमानातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही एअरलाइनने स्पष्ट केले.
