नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam case in Delhi)दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या (Manish Sisodia)अडचणीत वाढ झाली आहे. मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody)राऊस अव्हेन्यू कोर्टानं 14 दिवसांची वाढ केली आहे. सध्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना मद्य घोटाळ्याप्रकरणी 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.
त्यानंतर आज सोमवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं दारू घोटाळ्याच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. यापूर्वी 17 मार्चला राऊस अव्हेन्यू कोर्टानं माजी उपमुख्यमंत्र्यांच्या ईडी कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आलं.
दिल्लीमधील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांना सीबीआयनं 8 तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा अटक केली होती. सिसोदियांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या अटकेविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानं मनीष सिसोदियांनी दिल्ली सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.