आई होणं गुन्हा नाही, विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक

संघटनेने दावा केला की, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना उत्तेजक-विरोधी नियमांनुसार सहा महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

News Photo   2026 05 22T211514.692

आई होणं गुन्हा नाही, विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक

दिल्ली उच्च न्यायालयाने आई झाल्यानंतर (Wrestling) पुनरागमन करणाऱ्या भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला दिलासा दिला आहे. तर, भारतीय कुस्ती महासंघाला फटकारलं आहे. आई होणं हा गुन्हा नाही आणि कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही अशी टीप्पणी न्यायालयाने केली आहे. तसंच, खेळ हा कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वापेक्षा मोठा आहे. खेळाडूंच्या भविष्याशी अशी वागणूक देणं हे खेळाच्या हिताचं नाही असंही मत नोंदवलं आहे.

मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला विनेश फोगाटच्या तंदुरुस्तीचे आणि स्पर्धेत परत येण्याचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने असंही म्हटलं की, विनेशला आगामी आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे.

आम्ही मोहोळ आहोत, तू कुस्ती कशी करतो ते पाहून घेऊ; हिंदकेसरी वादानंतर महेंद्र गायकवाडांचा गंभीर आरोप

उच्च न्यायालयाने WFI च्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पूर्वीही दिलासा देण्यात आला आहे, परंतु विनेशच्या बाबतीत नियमांमध्ये झालेला हा अचानक बदल “बरेच काही सांगून जातो.” न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं, “या देशात मातृत्वाचा आदर केला जातो, त्याचा वापर खेळाडूच्या कारकिर्दीविरुद्ध शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही.

डब्ल्यूएफआयने विनेशला 26 जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास ‘अपात्र’ घोषित केले होते. संघटनेने दावा केला की, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना उत्तेजक-विरोधी नियमांनुसार सहा महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. तथापि, जुलै 2025 मध्ये आई झाल्यानंतर पुनरागमनाची तयारी करत असलेल्या विनेशने, असे असूनही गोंडा येथील राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत भाग घेतला. विनेशने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, 9 मे रोजी बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस हा केवळ तिला वगळण्याचा एक प्रयत्न होता.

100 ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे 2024 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमधून तिची अपात्रता ही ‘राष्ट्रीय लाजिरवाणी गोष्ट’ असल्याचे संबोधणाऱ्या या नोटीसवर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. 2023 मध्ये महिला कुस्तीपटूंच्या ज्या ऐतिहासिक चळवळीत माजी अध्यक्ष बृज भूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते, त्या चळवळीचा चेहरा विनेश फोगाट देखील होती. विनेश स्वत: पीडित असल्याचे म्हटलं आहे.

Exit mobile version