Delhi Police ACP Manasvi Vashishta Suspension Inside Story : कल्पना करा… ज्या पोलिसांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस जेव्हा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात… आणि त्यात एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभागी होतो… तर पोलीस प्रशासनात काय खळबळ उडू शकते?असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय देशाची राजधानी दिल्लीमध्ये.
दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर पोलिसांचं आंदोलन सुरू होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या, कामाचे तास आणि वरिष्ठांच्या कथित मनमानीविरोधात आवाज उठवला जात होता. पण या आंदोलनात एक नाव चर्चेत आलं… ते म्हणजे ACP मनस्वी वशिष्ठ आणि त्यानंतर जे घडलं, त्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. गृह मंत्रालयाने मनस्वी वशिष्ठ यांना थेट निलंबित केलं. पण प्रश्न असा आहे की, अखेर एका ACP दर्जाच्या अधिकाऱ्याला आंदोलनात सहभागी होण्याची वेळ का आली? मंत्रालयाने निलंबनाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यांना स्वतःच्या सहकाऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? चला, समजून घेऊयात दिल्लीतील या संपूर्ण खाकी वादाची इनसाईड स्टोरी…
आंदोलनाची ठिणगी नेमकी कुठून पडली?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती पोलिसांच्या मनात साचलेल्या असंतोषातून. दिवसाचे कित्येक तास ड्युटी… कधी सणासुदीला सुट्टी नाही, तर कधी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचीही संधी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखताना स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. कामाचे अफाट तास, मानसिक ताण, अंतर्गत मागण्या आणि वरिष्ठांच्या कथित मनमानीविरोधात पोलिसांमधील नाराजी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तेव्हा, जेव्हा ACP मनस्वी वशिष्ठ यांचं नाव या आंदोलनाशी जोडलं गेलं.
सामान्य पोलीस कर्मचारी आपल्या समस्या मांडत असताना, ACP दर्जाचा अधिकारीही त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरल्याचा आरोप झाला. आणि इथूनच या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं.आंदोलनानंतर गृह मंत्रालयाकडून मनस्वी वशिष्ठ यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. मंत्रालयाच्या आदेशानुसार, मनस्वी वशिष्ठ यांच्याविरोधात विभागीय कारवाई प्रस्तावित आहे. याच पार्श्वभूमीवर सक्षम प्राधिकाऱ्याने केंद्रीय नागरी सेवा म्हणजेच Central Civil Services (Classification, Control and Appeal) Rules, 1965 अंतर्गत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय.
निलंबनाच्या आदेशातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे निलंबनाच्या संपूर्ण कालावधीत मनस्वी वशिष्ठ यांचं मुख्यालय दिल्ली येथेच निश्चित करण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाहीये. म्हणजेच, निलंबनाच्या काळात दिल्लीबाहेर जायचं असेल, तरी त्यांना आधी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात विभागीय चौकशी काय निष्कर्ष काढते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निलंबनाच्या आदेशानंतर मनस्वी वशिष्ठ यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. ज्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ही केवळ एक विभागीय कारवाई आहे. मात्र, पोलिसांच्या प्रश्नांवर चर्चा होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे, आपलं निलंबन झालं असलं तरी मनोबल खचलेलं नाही आणि पोलिसांच्या हिताच्या मुद्द्यांप्रती असलेली आपली बांधिलकीही कमी झालेली नसल्याचेही वशिष्ठ यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी झाली, तर सत्य समोर येईल आणि आपली बाजू ऐकून घेतली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीये. म्हणजेच काय तर, एका बाजूला प्रशासनाची निलंबनाची कारवाई आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी ACP वशिष्ठ यांची भूमिका… यामुळे हा वाद आणखी चर्चेत आला आहे.
आता इथे सर्वात महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? तर याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला ‘Police Forces (Restriction of Rights) Act, 1966’ आणि संबंधित सेवा नियमांकडे पाहावं लागेल. या कायद्यानुसार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या संघटना स्थापन करण्याच्या आणि आंदोलन किंवा संप करण्याच्या अधिकारांवर विशेष निर्बंध आहेत. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पोलीस दलावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. त्यामुळे या दलात शिस्त कायम राहणं प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. याचा अर्थ पोलिसांनी आपल्या समस्या सहनच कराव्यात, असा होत नाही. पोलिसांना विभागीय तक्रार निवारण आणि कायदेशीर मार्गांचा वापर करता येतो. त्यामुळे ACP मनस्वी वशिष्ठ यांच्या प्रकरणात आंदोलनातील सहभाग आणि त्यासंदर्भातील सेवा नियमांचं उल्लंघन झालं का, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
निलंबन म्हणजे करिअर संपलं? पुन्हा सेवेत येण्याचा मार्ग काय?
आता सर्वात मोठा प्रश्न… मनस्वी वशिष्ठ यांचं पोलीस दलातील करिअर संपलं का? तर तसं अजिबात नाही. कारण निलंबन आणि बडतर्फी या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. निलंबन म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला तात्पुरत्या स्वरूपात सेवेतून दूर ठेवणं. याचा अर्थ त्यांना कायमस्वरूपी सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे, असा होत नाही. या प्रकरणात त्यांच्याविरोधात विभागीय कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळू शकते. चौकशीतील निष्कर्ष आणि प्रशासनाच्या निर्णयानुसार त्यांचं निलंबन मागे घेतलं जाऊ शकतं. याशिवाय, आवश्यक असल्यास ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच CAT किंवा उच्च न्यायालयातही दाद मागू शकतात. म्हणजेच, मनस्वी वशिष्ठ यांची पुढील वाटचाल आता विभागीय चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे.
पण दिल्लीतील या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांच्या स्वतःच्या समस्या कोण ऐकणार? एकीकडे पोलीस दलाची शिस्त आणि नियमांचं पालन आवश्यक आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या कामाचे तास, मानसिक ताण, कौटुंबिक आयुष्य आणि त्यांच्या मागण्यांकडेही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कारण शेवटी पोलीसही माणूसच आहेत. त्यांनाही अडचणी आहेत, भावना आहेत आणि आपल्या समस्या मांडण्याची गरज आहे. त्यामुळे दिल्लीतील हा वाद केवळ एका ACP अधिकाऱ्याच्या निलंबनापुरता मर्यादित राहत नाही तर, तो संपूर्ण पोलीस दलातील शिस्त, कर्मचारी कल्याण आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करतो.
आता वशिष्ठ यांच्या विभागीय चौकशीत काय निष्पन्न होतं? मनस्वी यांचं निलंबन मागे घेतलं जातं का? आणि पोलिसांच्या मागण्यांवर प्रशासन काही ठोस निर्णय घेतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांच्या समस्या मांडण्यासाठी ACP मनस्वी वशिष्ठ यांनी आंदोलनात सहभागी होणं योग्य होतं का? की पोलीस दलातील शिस्त लक्षात घेता त्यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
