केंद्र सरकारकडून अग्निवीर योजनेत मोठा बदल; कायमस्वरूपी होण्याचा नवा नियम आला समोर

Agniveer Scheme : चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांचं पुढे काय होणार, या प्रश्नावर केंद्र सरकारने भरती योजनेचं चित्र बदलणार आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 04T171803.485

Agniveer Scheme : केंद्र सरकारने अग्निवीर भरती योजनेत महत्त्वाचा बदल जाहीर केला असून, चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांना सैन्यदलात पुढे काम करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयानुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या 25 टक्के अग्निवीरांची गुणवत्तेच्या आधारे नियमित सैन्यसेवेसाठी निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना आणखी 2 वर्षे सेवा करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी दिली आहे.

अग्निवीर योजना सुरू झाल्यापासून चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर जवानांच्या पुढील भवितव्याचा मुद्दा चर्चेत होता. सेवाकाळ संपल्यानंतर सैन्यदलातून बाहेर पडणाऱ्या जवानांना रोजगार आणि पुढील संधींबाबत चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानेही या बदलाला मंजुरी दिली असून, याबाबतचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

अग्निवीरांना नोकरीत 10% आरक्षण ते लॉजिस्टिक्स पार्कला सवलती; मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

वाढीव दोन वर्षांच्या सेवाकाळात अग्निवीरांना आकर्षक वेतनासोबत अतिरिक्त सुविधा आणि भत्ते दिले जाणार आहेत. हा कालावधी पूर्ण करणाऱ्या जवानांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जाईल. या मूल्यमापनात पात्र ठरणाऱ्या अग्निवीरांना नियमित सैन्यसेवेत दाखल होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर सेवेतून बाहेर पडण्याची शक्यता असलेल्या जवानांसाठी सैन्यदलात पुढे राहण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे अग्निवीरांच्या सेवेला अधिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लष्कराची कार्यक्षमता वाढवण्यासोबतच तरुणांना सैन्यदलात दीर्घकाळ सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणं, हा या बदलामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, 25 टक्के जवानांची नियमित सेवेसाठी निवड आणि उर्वरित 75 टक्के जवानांच्या वाढीव सेवाकाळाबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी कशी होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

follow us