Download App

Delhi : ‘आप’ सरकारमध्ये खांदेपालट; आतिशी तब्बल 13 खात्यांच्या मंत्री

Delhi Politics : राजधानी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. दिल्ली सरकारमधील (Delhi Government) मंत्री आतिशी मार्लेना यांना न्याय विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर मंत्री कैलाश गेहलोत यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याआधी न्याय विभागाची जबाबदारी गेहलोत यांच्याकडे होती. तर महिला बालकल्याण खात्याची जबाबदारी आतिशी मार्लेना यांच्याकडे होती. दिल्ली सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळातील या बदलांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने उपराज्यपाल यांना पत्र लिहीत शिफारस केली होती. त्यास उपराज्यापालांनी मंजुरी दिली होती. या बदलांनंतर आता मंत्री आतिशी यांच्याकडे न्याय विभागासह एकूण 13 खात्यांची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या तुलनेत आतिशी यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. याआधी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्याकडे जल विभागाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सहा महिन्यांपूर्वी आतिशी यांच्याकडे महसूल, योजना आणि वित्त विभागांचा कार्यभार देण्यात आला होता. याआधी या विभागांची जबाबदारी परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांच्याकडे होती. नव्या फेरबदलात कैलाश गेहलोत यांच्याकडून न्याय खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून फायली प्रलंबित राहिल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने न्याय खाते आतिशी यांच्याकडे सोपविण्याची शिफारस केली होती.

उपराज्यपाल सचिवालयाच्या प्रमुख सचिवांच्या अहवालानुसार स्पष्ट केले गेले की कायदा मंत्र्यांकडे 18 फायली प्रलंबित राहिल्या होत्या. या फायलींवर तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यावर काहीच उत्तर दिले गेले नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराज्यपालांनी कोर्ट आणि न्यायिक प्रशासनाशी संबंधित महत्वाचे प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्ली सरकारमध्ये हा फेरबदल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप

आतिशी या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू मानल्या जातात. त्यांच्याकडे आता विधी व न्याय विभागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील खात्यांची संख्या आता 13 झाली आहे. मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याकडे इतकी खाती नाहीत. कैलाश गेहलोत यांच्याकडील काही खाती काढून त्यांना दिली आहेत. याआधी मनिष सिसोदिया यांच्याकडील शिक्षण खात्याचा कारभारही त्यांच्याकडे देण्यात आला होता.

Tags

follow us