दिल्लीच्या मालवीय नगर येथील हॉटेल फ्लॉरिस स्टेमध्ये बुधवारी भीषण आग लागली. या आगीच्या विळख्यात सापडल्याने २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेवेळी काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून उड्या मारल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या दुर्घटनेनंतर हॉटेलच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. या हॉटेलला दिल्ली सरकारकडून बेड अँन्ड ब्रेकफास्ट कॉन्सेप्टनुसार परवाना जारी केला होता. ज्यात केवळ ६ रूम उभारण्याची परवानगी होती. परंतु हॉटेलमध्ये २० हून अधिक खोल्या उभारण्यात आल्या होत्या. त्यातील काही खोल्या बेसमेंटमध्ये होत्या. ज्यामुळे सुरक्षेचा गभीर प्रश्न निर्माण झाला. या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
सकाळी ९ च्या सुमारास ही आग लागली. सध्या प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या घटनेचा तपास करत आहे. हॉटेलमध्ये सुरक्षा मानकांचे पालन केले जात होते का आणि परवाना याचीही पडताळणी केली जात आहे. सविस्तर रिपोर्टनंतर या घटनेतील जबाबदार व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेकिंग : राजधानी दिल्लीत भीषण आग्नीतांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये अनेक विदेशी प्रवासी
या दुर्घटनेवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून लिहिलंय की, मालवीय नगरमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत जी जीवितहानी झाली त्याबद्दल मी दु:खी आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहचली. दिल्ली सरकार या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक आरोग्य सेवा आणि इतर मदत पुरवली जात आहे असं त्यांनी माहिती दिली.
दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेतून ३५ लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले. ज्यातून लोक जीव वाचवण्यासाठी रेलिंगमधून उडी मारताना दिसत होते. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. बेसमेंटमध्ये अनेक लोक अडकले होते. ते बाहेर येण्याच्या गेटवर टाळा लावला होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी हा टाळा तोडून रेस्क्यू ऑपरेशन केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
