डॉक्टरांचे तुमच्यावर ChatGPT वापरून उपचार? भारतातील डॉक्टरांच्या AI वापरावर मोठा रिपोर्ट…
AI in Healthcare अनेक डॉक्टर सर्वसाधारण AI टूल्सवर अवलंबून, भारतातील 54 टक्के डॉक्टर AI चा वापर करत असल्याचे समोर
तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तपासणी होते आणि उपचार सुरू होतात. पण त्या उपचारामागील काही निर्णय घेण्यासाठी ChatGPT सारख्या AI चॅटबॉटची मदत घेतली गेली असेल, तर? हा प्रश्न अनेकांना धक्का देणारा वाटू शकतो. मात्र, भारतातील डॉक्टरांमध्ये AI चा वापर झपाट्याने वाढत असून, अनेक डॉक्टर सर्वसाधारण AI टूल्सवर अवलंबून असल्याचे एका नव्या अहवालातून समोर आले आहे. भारतातील 54 टक्के डॉक्टर AI चा वापर करत असल्याचे समोर आले आहे. पण, तज्ज्ञांच्या मते, AI डॉक्टरांचा चांगला सहायक ठरू शकतो, पण वैद्यकीय वापरासाठी तयार न केलेल्या AI वर अतिरेकी अवलंबून राहणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. हा अहवाल नेमका काय? त्याबद्दस जाणून घेऊया…
अहवाल नेमका काय?
साइंटफिक पब्लिकेशन संस्था एल्सेवियरच्या ‘क्लिनिशियन ऑफ द फ्यूचर 2026’ रिपोर्टनुसार, भारतातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 48 टक्के डॉक्टर आणि क्लिनिशियन दैनंदिन कामात AI चा वापर करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यापैकी 54 टक्के डॉक्टर ChatGPT सारख्या सर्वसाधारण AI टूल्सचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. याउलट, केवळ 26 टक्के डॉक्टर वैद्यकीय संशोधन आणि क्लिनिकल डेटावर आधारित विशेष Medical AI Platforms वापरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉक्टर AI चा नेमका कशासाठी वापर करतात?
भारतातील डॉक्टर AI चा वापर थेट रुग्णांवर उपचार करण्यासाठी नव्हे, तर उपचार प्रक्रियेला मदत करणाऱ्या अनेक कामांसाठी करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मेडिकल रिसर्च, नवीन उपचार पद्धतींची माहिती मिळवणे, औषधांबाबत माहिती शोधणे, रुग्णांना आजार समजावून सांगणे, क्लिनिकल नोट्स आणि डॉक्युमेंटेशन तसेच उपचारासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत मदत आदी गोष्टींचा समावेश आहे.
AI वापराचा धोका का?
एल्सेवियरचे लीड क्लिनिकल एक्झिक्युटिव्ह डॉ. राहुल गोयल यांच्या मते, ChatGPT सारखे सर्वसाधारण AI टूल्स इंटरनेटवरील विविध स्रोतांमधून माहिती गोळा करतात. या स्रोतांमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी न झालेली किंवा अपूर्ण माहिती असू शकते. याउलट, विशेष Medical AI Platforms हे प्रमाणित वैद्यकीय पुस्तके, संशोधन जर्नल्स आणि अधिकृत क्लिनिकल गाइडलाइन्सवर आधारित असतात. एखाद्या विषयावर पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसेल, तर हे प्लॅटफॉर्म तशी स्पष्ट सूचना देतात.
चूक AI ची… जबाबदारी मात्र डॉक्टरांची…
डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले की, AI ने चुकीची माहिती दिली आणि त्यावर आधारित उपचार करण्यात आले, तर त्याची कायदेशीर जबाबदारी AI कंपनीवर नसून संबंधित डॉक्टरवरच राहते. कारण, रुग्णाच्या उपचाराचा अंतिम निर्णय हा डॉक्टरच घेत असतो. त्यामुळे AI कडून मिळालेली माहिती पडताळून पाहणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे.
अहवालात कोणाचा समावेश होता?
‘क्लिनिशियन ऑफ द फ्यूचर 2026’ अहवालासाठी 118 देशांतील 2,757 आरोग्य कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये भारतातील 426 डॉक्टर आणि 112 पॅरामेडिक्स सहभागी होते.
AI डॉक्टरांची जागा घेणार का?
आता हे सर्व वाचून आणि ऐकून तुमच्या मनात काहीशी भीती आणि शंकांचं काहूर माजलं असेल आणि आता AI डॉक्टरांची जागा घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला असेल तर, याचे उत्तर तज्ज्ञांनी स्पष्टपणे ‘नाही’ असे दिले आहे. AI डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही, तर त्यांचे काम अधिक वेगवान, अचूक आणि सोपे करण्यासाठी आहे. विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत, तिथे योग्य प्रकारे विकसित केलेले मेडिकल AI उपचारांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.
कोणत्या AI वर डॉक्टरांचा अधिक विश्वास?
‘क्लिनिशियन ऑफ द फ्यूचर 2026’ रिपोर्टनुसार भारतीय डॉक्टर अशाच AI प्रणालींना अधिक विश्वासार्ह मानतात ज्या वापरण्यास सोप्या आहेत,
स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळल्या गेल्या आहेत, उत्तरांसोबत संदर्भ म्हणजेच रेफरन्सेस देतात, चुकीची माहिती टाळण्यासाठी प्रशिक्षित आहेत आणि अनेक दर्जेदार वैद्यकीय स्रोतांवर आधारित आहेत.
AI हे साधन… अंतिम निर्णय मात्र डॉक्टरांचाच
एकूणच, AI मुळे आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडत असली, तरी तो डॉक्टरांचा पर्याय नाही. AI मुळे डॉक्टरांचा वेळ वाचू शकतो, संशोधन अधिक वेगाने होऊ शकते आणि उपचार प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनू शकते. मात्र, रुग्णाचे निदान, उपचार आणि त्याची अंतिम जबाबदारी ही डॉक्टरांचीच असते. त्यामुळे AI कडून मिळालेल्या माहितीची वैद्यकीय पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी, क्लिनिकल निरीक्षण आणि वैद्यकीय निर्णयक्षमता यांची जागा AI घेऊ शकत नाही. AI हे डॉक्टरांसाठी एक प्रभावी सहाय्यक ठरू शकते, पण अंतिम निर्णय घेणारा “डॉक्टर”च असतो. याच कारणामुळे तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला आहे की, AI चा वापर करा, पण त्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. कारण आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक निर्णयामागे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर मानवी अनुभव आणि जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते.