आयुष्य भराची साथीदार मानलं अन् सारं विकून तिला भेटायला गेला! AI, धोका… अन् 2000 KM प्रवासाचा धक्कादायक शेवट
ब्राझीलमधील ही घटना ऑनलाइन ओळख आणि AI-निर्मित व्यक्तिमत्त्वांवर आंधळा विश्वास ठेवल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांची जाणीव करून देते.
Brazilian bricklayer’s dream girl turns out to be AI-generated: सोशल मीडियावर ओळख झाली, प्रेम जडलं आणि प्रेयसीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी एका व्यक्तीने आपलं सामान विकून तब्बल 1,931 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, या प्रवासाच्या शेवटी त्याला मोठा धक्का बसला. ज्या महिलेला तो आपली प्रेयसी समजत होता, ती प्रत्यक्षात खरी व्यक्तीच नव्हती. तिची प्रतिमा आणि व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आले होते. ब्राझीलमधील या घटनेमुळे सोशल मीडियावरील बनावट ओळखींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर जडलं प्रेम
या घटनेतील 49 वर्षीय एडिमार मार्टिन्स हा बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार आहे. सोशल मीडियावर त्याची जेसिका ऑलिव्हेरा नावाच्या महिलेच्या अकाउंटशी ओळख झाली. या अकाउंटवर ग्रामीण जीवनाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केले जात होते. विशेष म्हणजे, या अकाउंटला 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
आईच्या निधनानंतर मार्टिन्स एकटेपणाचा सामना करत होता. अशा परिस्थितीत या महिलेच्या अकाउंटमुळे त्याला आयुष्यात जोडीदार मिळण्याची आशा वाटू लागली. संबंधित व्हिडिओंमध्ये तिच्यासोबत राहण्यासाठी येणाऱ्या पुरुषांना घर आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही दिले जात असल्याचे वृत्त आहे.
प्रेयसीला भेटण्यासाठी विकलं सामान
मार्टिन्सने या महिलेला प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी त्याने आपल्या जवळच्या वस्तू विकल्या. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी त्याने प्रवासाला सुरुवात केली. एक दिवसापेक्षा अधिक काळ बसने प्रवास केल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी तो ब्राझीलमधील बेलो होरिझोंटे शहरात पोहोचला.
मात्र, शहरात पोहोचल्यानंतर त्याने त्या महिलेचा शोध सुरू केला असता, त्याला अनपेक्षित अनुभव आला. महिलेचे फोटो सोबत घेऊन तो स्थानिक नागरिकांना तिच्याबद्दल विचारत होता. पण कोणालाही तिच्याबद्दल माहिती मिळाली नाही.
अखेर समोर आलं AI चं सत्य
स्थानिक रेडिओ स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर मार्टिन्सला सत्य समजलं. ज्या महिलेला भेटण्यासाठी त्याने आपलं सामान विकलं आणि एवढा मोठा प्रवास केला, ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती. तिची प्रतिमा आणि व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आले होते.
या अकाउंटमागील व्यक्तीने संबंधित व्यक्तिरेखा AI-निर्मित असल्याचं मान्य केलं. सोशल मीडियावरील एंगेजमेंट वाढवून व्यावसायिक फायदा मिळवणं हा अकाउंटचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, मार्टिन्सशी वैयक्तिक संपर्क साधल्याचा दावा नाकारण्यात आला.
अनोळखी शहरात अडकला; सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
या प्रवासात मार्टिन्सचे पैसे खर्च झाले होते. त्यामुळे तो अनोळखी शहरात अडकला. अशा परिस्थितीत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला मदतीचा हात दिला. त्याच्या जेवणाची आणि आंघोळीची व्यवस्था करण्यात आली, तसेच घरी परतण्यासाठी बसचं तिकीटही उपलब्ध करून देण्यात आलं.
या धक्कादायक अनुभवानंतरही मार्टिन्सने जोडीदार शोधण्याची आशा सोडलेली नसल्याचं वृत्त आहे.
सोशल मीडियावरील ओळखीबाबत सावध राहण्याची गरज
AI तंत्रज्ञानामुळे आता बनावट चेहरे, व्हिडिओ आणि आभासी व्यक्तिमत्त्वं तयार करणं शक्य झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीशी ओळख झाल्यानंतर तिच्यावर लगेच विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. विशेषतः प्रेमसंबंधांच्या नावाखाली पैसे, भेटवस्तू किंवा प्रवासासाठी खर्च करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सत्यता पडताळणं आवश्यक आहे.
ब्राझीलमधील ही घटना ऑनलाइन ओळख आणि AI-निर्मित व्यक्तिमत्त्वांवर आंधळा विश्वास ठेवल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांची जाणीव करून देते.