हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

पोलिसाने काठीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी वेगाने पळवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.

Untitled Design 93 1

Untitled Design 93 1

Why did the police have to break into the car? : हैदराबादच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधापूर परिसरात मध्यरात्रीनंतर बेधडक कार रेसिंग आणि स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारात कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला कारने जोरदार धडक दिली असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेमुळे शहरातील वाढत्या स्ट्रीट रेसिंगच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निलुओफर कॅफेजवळ काही तरुणांनी बदल केलेल्या सायलेन्सर असलेल्या गाड्यांसह जोरदार स्टंट आणि रेसिंग सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसांच्या दिशेने कार चालवली.

या घटनेत कॉन्स्टेबल रमेश यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर मोठ्या संख्येने तरुण जमल्याचे दिसत आहे. काहीजण कार रेसिंग आणि धोकादायक स्टंटचा आनंद घेताना दिसत आहेत. एका पोलिसाने काठीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी वेगाने पळवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. सायबराबाद पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चालकाने जाणीवपूर्वक कॉन्स्टेबलला धडक दिली.

 

दरम्यान, आठवड्याच्या शेवटी आयटी कॉरिडॉर परिसरात कार आणि बाईक रेसिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या वारंवार इशाऱ्यानंतरही अनेक तरुण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत जीवघेणे स्टंट करत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सायबराबाद पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल 294 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये 255 दुचाकीस्वार, 5 तीनचाकी चालक आणि 34 चारचाकी वाहन चालकांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक चालकांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले. काही जणांची BAC पातळी 300 मिग्रॅपेक्षा अधिक होती, जी अत्यंत गंभीर मानली जाते. सायबराबाद पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून जर एखादा प्राणघातक अपघात घडवला, तर संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका

दरम्यान, बंजारा हिल्स झोनचे एसीपी हरिप्रसाद यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुणांमध्ये वाढणाऱ्या बेफाम बाइक आणि कार रेसिंगबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून हाय-एंड बाइक्स आणि स्पोर्ट्स कार वेगाने चालवण्याची वाढती प्रवृत्ती अनेक निष्पाप जीवांसाठी धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, रस्त्यावर स्टंटबाजी करण्याऐवजी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात आणि तरुणांचे अकाली मृत्यू टाळता येऊ शकतात.

हैदराबादमध्ये वाढत चाललेल्या या स्ट्रीट रेसिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, पोलिसांनी आता आणखी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

Exit mobile version