Water Crises Due To AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने जगभरात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणली आहे. चॅटबॉट्सपासून ते इमेज जनरेटर्सपर्यंत सर्व काही AI मुळे सोपे झाले आहे. मात्र, या डिजिटल झगमगाटामागे एक गंभीर पर्यावरणविषयक संकट उभे राहत आहे, ज्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. ते म्हणजे ‘AI चा वाढता पाणी वापर’ (AI Water Consumption). वाढत्या AI वापरामुळे पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे साठे धोक्यात येऊ शकतात का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काय म्हणते युनायटेड नेशन्सची रिपोर्ट?
जून 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’च्या एका अहवालानुसार, 2026 ते 2030 या काळात AI संचालित डेटा सेंटर्समधील पाण्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते, या सिस्टिम्सना लागणारे पाणी हे सुमारे 1.3 अब्ज लोकांच्या वार्षिक घरगुती वापराच्या पाण्याइतके असू शकते.
डिजिटल तंत्रज्ञानाला पाण्याची गरज का?
AI पूर्णपणे डिजिटल वाटत असले तरी, ते चालवण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा (Physical Infrastructure) अत्यंत विशाल आहे. AI मॉडेल्स डेटा सेंटर्समधील हजारो सर्व्हरवर प्रक्रिया करतात. या प्रक्रियेत प्रचंड उष्णता निर्माण होते. सर्व्हरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘कूलिंग सिस्टिम’चा वापर केला जातो, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची गरज लागते.AI सिस्टिम ट्रेन करण्यासाठी वापरले जाणारे शक्तिशाली चिप्स आणि प्रोसेसर २४ तास सुरू असतात, ज्यामुळे सतत कूलिंगची आवश्यकता असते. . जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असल्यामुळे, या सुविधांची संख्या आणि आकारही वेगाने वाढत आहे
AI मुळे जगात पाण्याची टंचाई निर्माण होईल का?
AI च्या या प्रचंड पाणी वापरामुळे आता अनेक देशांतून विरोध सुरू झाला आहे. विशेषतः चिलीसारख्या दुष्काळग्रस्त भागांत, जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तिथे डेटा सेंटर प्रोजेक्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिक आवाज उठवत आहेत.आता जगभरात मोठ्या प्रमाणात AI साठी वापरल्या जाणाऱ्या गोड्या पाण्यामुळे जगात पाण्याची टंचाई निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्यावरण संशोधकांच्या मते, केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पृथ्वीवरील जलस्रोत संपण्याची शक्यता कमी आहे. पण, जर कोणतीही शाश्वत योजना आखली गेली नाही, तर 2030 पर्यंत AI चा वार्षिक ‘वॉटर फुटप्रिंट’ 1.1 ते 1.7 ट्रिलियन गॅलनपर्यंत पोहोचू शकतो आणि पाण्याची सध्याची टंचाई अधिकच गंभीर होऊ शकते.
