Lalu Prasad Yadav ED Notice : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी आज ईडीने (ED) आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या महिन्याच्या अखेरीस पाटणा कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांवर जमिनीच्या बदल्यात रेल्वेच्या नोकऱ्यांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत.
लालू-तेजस्वी यांना ईडीची नोटीस
ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. ईडीने लॅंड फॉर जॉब प्रकरणी हे समन्स पाठवले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः यादव यांच्या निवासस्थानी जाऊन समन्स दिलं. ईडीने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना 29 आणि 30 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी पाटणा येथील ईडीच्या झोन कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत
वास्तविक, ईडीने लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना पहिल्यांदा 22 आणि नंतर 27 डिसेंबरला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ईडीचे समन्स असूनही, तेजस्वी यादव दिल्लीत पोहोचले नाहीत किंवा लालू प्रसाद चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने नोटीस दिली
ईडीच्या दुसऱ्या समन्सनंतरही लालू-तेजस्वी आले नाहीत. यानंतर शुक्रवारी अचानक ईडीचे पथक राबरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना स्वतःच्या हाताने समन्स दिले. प्राप्त कागदपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर ईडीचे पथक राबरी निवासस्थानातून निघून गेले.या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेला व्यापारी अमित कात्याल याची चौकशी केल्यानंतर 11 नोव्हेंबरला ईडीला काही नवीन माहिती मिळाली आहे. त्यानंतर ईडीला तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांची चौकशी करणे आवश्यक झालं आहे.त्यामुळं त्यांना समन्स बजावलं आहे.
नेमका घोटाळा काय?
जमीनीच्या बदल्यात नोकरी देण्याचं हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कथित ‘ग्रुप-डी’ नोकरीशी संबंधित आहे. 2004-2009 दरम्यान मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आले होते आणि त्या बदल्यात जमीनी घेण्यात आल्याचा आरोप लालू प्रसाद यांच्यावर आहे.