ECI replies to Rahul Gandhi Alligation : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राहुल यांच्या आरोपांची ‘स्क्रिप्ट’ जुनी आहे आणि ती ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’ सारखी आहे, असे आयोगाने म्हटले आहे. २०१८ मध्ये कमलनाथ यांनीही असेच आरोप केले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते, याची आठवण आयोगाने करून दिली.
❌ The statements made are Misleading #ECIFactCheck
✅Read in detail in the image given👇 https://t.co/K1sKq1DvbU pic.twitter.com/tdqudyoXU2
— Election Commission of India (@ECISVEEP) August 8, 2025
राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर काय?
राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.7) घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर पत्ते, ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा न देणे, मतदार यादीतील अनियमितता, मतदानाच्या टक्केवारीत अचानक वाढ, भाजपला मदत करणे आणि संविधानाचे उल्लंघन असे गंभीर आरोप केले होते. त्यावर आयोगाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पटकथा जुनी आहे. एक गोष्ट पुन्हा पुन्हा केली जात असून हा प्रकार म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारूसारखे आहे.
कमलनाथ यांनीही हेच केले होते
पुढे आयोगाने राहुल गांधींकडून केले जाणारे आरोप २०१८ मध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनीही केले होते. त्यांनी एका खाजगी वेबसाइटवरून डेटा डाउनलोड करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र, ज्या त्रुटींबद्दल ते बोलत होते त्या चार महिन्यांपूर्वी दुरुस्त करण्यात आल्या होत्या आणि त्याची प्रत पक्षाला देण्यात आली होती असे आयोगाने म्हटले आहे. कमलनाथ यांनी त्यावेळी ‘सर्चेबल पीडीएफ’ वोटर लिस्ट पीडीएफ’ यादीची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीचे मतदार कार्ड तीन राज्यांमध्ये बनवले गेल्याचेही राहुल यांनी म्हटले होते. त्यावर काही महिन्यांपूर्वीच यात दुरूस्ती करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. असे केल्याने ते सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत नसल्याचे आधोरेखित होत आहे. जर मतदार कार्डामध्ये काही तफावत असेल तर, त्यावर आक्षेप घेण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी आधीच स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत. राहुल गांधी यांनीही हीच कायदेशीर प्रक्रिया पाळायला हवी होती. परंतु, त्यांनी माध्यमांमध्ये निराधार आरोप केले.