इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमध्येच 30 लाख रूपये महिना, कुणी उघडला पेटारा?

Engineering Students इंटर्नशिप म्हटली की, काही हजार रुपयांचे स्टायपेंड, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इंडस्ट्रीची ओळख एवढेच अपेक्षित पण...

Engineering Students

Engineering Students

Engineering Students Internships : साधारणपणे इंटर्नशिप म्हटली की, विद्यार्थ्यांना काही हजार रुपयांचे स्टायपेंड, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इंडस्ट्रीची ओळख एवढेच अपेक्षित असते. अनेक ठिकाणी तर इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. मात्र, भारतातील हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग (HFT) कंपन्यांनी हीच कल्पना पूर्णपणे बदलून टाकली आहे. या क्षेत्रातील काही कंपन्या अत्यंत हुशार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदरम्यानच लाखो रुपयांचे स्टायपेंड देत असून, काही प्रकरणांमध्ये ही रक्कम तब्बल महिन्याला 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे.

महिन्याला 30 लाख रुपये कोण देतंय?

ब्लूमबर्गच्या अहवालाचा हवाला देत समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामस्थित Quadeye ही HFT कंपनी काही इंटर्न्सना महिन्याला सुमारे 30 लाख रुपये देत आहे. याशिवाय IMC Trading आणि Optiver यांसारख्या जागतिक ट्रेडिंग कंपन्यांकडूनही इंटर्नशिपसाठी मोठ्या प्रमाणावर स्टायपेंड दिले जात असल्याची माहिती आहे. काही प्रकरणांमध्ये ही रक्कम 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. तर, Gravitation Research Capital दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत स्टायपेंड देत आहे.

प्रत्येक इंजिनिअरला मिळणार नाही 30 लाख…

इंटर्नशिपमध्ये 30 ते 60 लाख रुपयांचे पॅकेज ऐकून अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी वाटू शकते. पण प्रत्यक्षात या कंपन्या अत्यंत निवडक विद्यार्थ्यांचीच भरती करत आहेत. या नोकऱ्यांसाठी केवळ इंजिनिअरिंगची पदवी पुरेशी नसून, विद्यार्थ्यांकडे काही विशिष्ट तांत्रिक कौशल्ये असणे आवश्यक आहे.

कंपन्यांकडून कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य?

विशेषतः IIT आणि देशातील इतर प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांमधील विद्यार्थ्यांना या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर संधी मिळत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातही ज्या विद्यार्थ्यांमध्ये खालील स्किल्स आहेत त्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे.

– कोडिंग आणि प्रोग्रामिंगमध्ये मजबूत पकड
– डेटा सायन्स आणि अल्गोरिदमची समज
– क्लिष्ट समस्या सोडवण्याची क्षमता
– वेगाने आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता
– कॉम्प्युटर सायन्स, गणित किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील शैक्षणिक पार्श्वभूमी

HFT कंपन्या एवढे पैसे का देत आहेत?

एखाद्या इंटर्नला कंपनी महिन्याला 30 लाख रुपये का देईल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर, यामागे या कंपन्यांचे कामकाज आणि त्यातून निर्माण होणारा नफा महत्त्वाचा आहे. हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये संगणक प्रणाली आणि अत्यंत वेगवान अल्गोरिदमच्या मदतीने शेअर बाजार आणि इतर आर्थिक बाजारांमध्ये मोठ्या संख्येने व्यवहार केले जातात. व्यवहाराचा वेग, गणिती मॉडेल्स, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदमची अचूकता यांना येथे प्रचंड महत्त्व असते. एखाद्या विद्यार्थ्याकडे अशा प्रकारचे अल्गोरिदम तयार करण्याची किंवा गुंतागुंतीच्या गणिती समस्या सोडवण्याची क्षमता असेल, तर त्याचे कौशल्य कंपनीसाठी अत्यंत मौल्यवान ठरू शकते. म्हणूनच टॅलेंटसाठी कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे इंटर्नशिपचे स्टायपेंडही लाखोंमध्ये पोहोचले आहे.

पण, अशा प्रकारच्या इंटर्नशिपकडे केवळ प्रशिक्षण म्हणून पाहता येणार नाही. अनेक HFT कंपन्यांसाठी ही भविष्यातील टॅलेंट शोधण्याची प्रक्रिया असते. इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्याची समस्या सोडवण्याची क्षमता, कोडिंग, गणिती कौशल्य आणि प्रत्यक्ष कामातील कामगिरी तपासली जाते. विद्यार्थी कंपनीच्या अपेक्षांवर खरा उतरला तर, पुढे अत्यंत आकर्षक पगाराची पूर्णवेळ नोकरी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप केवळ पैसे कमावण्याची संधी नसून, करिअरच्या दृष्टीनेही मोठी संधी ठरू शकते.

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठा संदेश

समोर आलेल्या या आकडेवारीमुळे इंजिनिअरिंग क्षेत्रातील रोजगाराच्या बदलत्या स्वरूपावरही प्रकाश पडला असून, केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विशेष कौशल्ये विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाजारात किती मोठी किंमत मिळू शकते, हे यावरून अधोरेखित होत आहे. विशेषतः प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, अल्गोरिदम आणि गणित या क्षेत्रांमध्ये मजबूत पकड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधींचे प्रमाण वाढत आहे. मात्र, महिन्याला 30 लाख किंवा इंटर्नशिपमध्ये 50-60 लाख रुपये ही अत्यंत निवडक आणि अपवादात्मक उदाहरणे आहेत. भारतातील सर्व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना किंवा सर्व इंटर्न्सना एवढे स्टायपेंड मिळत नाही हेही तितकेच खरे आहे. थोडक्यात काय तर, इंटर्नशिप म्हणजे फक्त अनुभव मिळवण्याचा टप्पा राहिलेला नाही. HFT सारख्या काही अत्यंत नफाक्षम क्षेत्रांमध्ये असामान्य तांत्रिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हीच इंटर्नशिप कोट्यवधींच्या करिअरची पहिली पायरी ठरू शकते हे मात्र नक्की.

Exit mobile version