PF खातेदारांसाठी मोठी बातमी! पुढील महिन्यापासून UPI अन् ATM द्वारे PF निघणार?

EPF withdrawals via UPI PF खात्यातील पैसे काढण्यासाठी आता अर्ज आणि प्रक्रियेच्या प्रतीक्षेत राहावं लागण्याची शक्यता कमी होणार

EPF withdrawals via UPI

EPF withdrawals via UPI

EPF Withdrawals via UPI May Begin By December : नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार EPFO 3.0 अंतर्गत PF खात्यातील पैसे UPI आणि ATM च्या माध्यमातून काढता येणार आहेत. सध्या या सुविधा तयारी अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर 2026 अखेरपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. EPFO 3.0 चं व्यापक लॉन्चिंग फेब्रुवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे.

UPI द्वारे PF मधील पैसे कसे काढता येणार?

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, UPI द्वारे पैसे काढण्याच्या सुविधेची चाचणी पूर्ण झाली असून, चाचणीदरम्यान समोर आलेल्या तांत्रिक अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. ही सुविधा सदस्याच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN आणि UPI खात्याशी जोडलेली असेल. यासाठी EPFO खात्याशी जोडलेलं आणि पडताळणी पूर्ण झालेलं बँक खाते आवश्यक असेल.

सध्या उपलब्ध माहितीनुसार, सदस्यांना BHIM ॲपच्या माध्यमातून PF खात्यातील पैसे काढता येऊ शकतात. यासोबतच किती रक्कम काढण्यासाठी उपलब्ध आहे, तसेच निवृत्ती खात्यात किमान किती रक्कम शिल्लक ठेवणं आवश्यक आहे, याची माहितीही मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सुविधेची अंतिम प्रक्रिया आणि वापरासंबंधीचे नियम EPFO कडून अधिकृतपणे जाहीर होणं बाकी आहे.

PF मधील किती पैसे काढता येणार?

या नव्या सुविधेबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे ती म्हणजे PF खात्यातून किती रक्कम काढता येणार? सुरुवातीला सदस्यांना त्यांच्या PF मधील उपलब्ध निधीपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा मिळू शकते. मात्र, याबाबतची अंतिम मर्यादा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही. दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने PF खात्यातील अनिवार्य किमान शिल्लक 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सदस्य आता PF खात्यातील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकणार आहेत.

PF मधून पैसे काढण्याचे नियमही झाले सोपे

EPFO ने यापूर्वीच आंशिक PF पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्याचे 13 स्वतंत्र नियम होते. आता त्यांची तीन प्रमुख गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक गरजा जसे की, शिक्षण, विवाह आणि इतर आवश्यक खर्चांसाठी, घरासंबंधी गरजा यात घर खरेदी, बांधकाम किंवा घराशी संबंधित पात्र खर्चांसाठी आणि विशेष परिस्थिती जसे की, विशिष्ट अडचणी किंवा पात्र परिस्थितींमध्ये आर्थिक मदतीसाठी पैसे काढता येतात. सध्या शिक्षणासाठी PF खात्यातून 10 वेळा आणि विवाहासाठी 5 वेळा पैसे काढण्याची मुभा आहे. याआधी या दोन्ही कारणांसाठी प्रत्येकी तीन वेळा पैसे काढण्याची मर्यादा होती. याशिवाय EPFO ने किमान सेवा कालावधीची अट 12 महिने निश्चित केली असून, पात्र ॲडव्हान्स क्लेमसाठी ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे.

WhatsApp वरूनही तपासता येणार PF खात्याची माहिती

EPFO ने सदस्यांसाठी WhatsApp सेवाही सुरू केली आहे. या माध्यमातून सदस्यांना PF खात्यातील शिल्लक तपासणे, पासबुक पाहणे आणि खात्यातील शेवटचे पाच व्यवहार पाहणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय EPFO 2.0 अंतर्गत पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आली असून, विविध प्रादेशिक कार्यालयांमधील डेटाबेस एकत्रित करण्यासाठी केंद्रीकृत डेटाबेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सदस्यांना त्यांच्या खात्याची माहिती मिळवणं आणि क्लेमची प्रक्रिया पूर्ण करणं अधिक सोपं होण्याची अपेक्षा आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने निवृत्त होणाऱ्या सदस्यांसाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) मंजूर केला आहे. या प्रस्तावित सुविधेनुसार, पात्र निवृत्त सदस्यांना PF खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी ठराविक कालावधीनुसार हप्त्यांमध्ये मिळू शकते. यामुळे निवृत्तीनंतरही सदस्यांना त्यांच्या जमा निधीतून नियमित अंतराने पैसे मिळवण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र, या सुविधेच्या अटी आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट होणं बाकी आहे.

नोकरदारांना नेमका काय फायदा होणार?

EPFO 3.0 मुळे PF संदर्भातील अनेक सेवा डिजिटल आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे. UPI आणि ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा, पात्र क्लेमचं स्वयंचलित सेटलमेंट, WhatsApp सेवा आणि एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म यामुळे सदस्यांचा वेळ वाचू शकतो. विशेष म्हणजे, PF हा केवळ निवृत्तीनंतर मिळणारा निधी नसून गरजेच्या वेळी उपयोगी पडणारी आर्थिक बचत आहे. त्यामुळे या निधीपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

UPI आणि ATM द्वारे पैसे काढण्याच्या सुविधा अद्याप प्रस्तावित किंवा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत क्लेम सेटलमेंट होण्याचा फायदा पात्र आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करणाऱ्या अर्जांनाच मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे EPFO च्या अधिकृत घोषणेनंतरच अंतिम नियम आणि सुविधांची अंमलबजावणी स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version