नोकरी बदलणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! EPFO ने PF ट्रान्सफरसाठी दिले दोन सोपे पर्याय; जाणून घ्या डिटेल्स
EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या नव्या मेंबर पोर्टलवर PF बॅलन्स ट्रान्सफरसाठी दोन वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
EPFO PF Transfer Update : नोकरी बदलल्यानंतर जुन्या कंपनीतील भविष्य निर्वाह निधी (PF) नव्या नियोक्त्याकडे (Employer) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या नव्या मेंबर पोर्टलवर PF बॅलन्स ट्रान्सफरसाठी दोन वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची गरज कमी होणार असून कर्मचाऱ्यांना त्यांची निवृत्ती बचत एकाच खात्यात सहजपणे एकत्र करता येणार आहे.
सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर नवीन फीचर सुरू
EPFO च्या डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे. काही दिवस पोर्टल बंद राहिल्यानंतर आता सेवा पुन्हा सुरू झाली असून, सुरुवातीच्या काळात काही क्लेम प्रक्रियेला थोडा विलंब होऊ शकतो, असे EPFO ने स्पष्ट केले आहे.
PF ट्रान्सफरसाठी दोन पर्याय
EPFO च्या नव्या पोर्टलवर UAN वापरून लॉग-इन केल्यानंतर कर्मचारी खालील दोन पद्धतींनी PF ट्रान्सफरची विनंती करू शकतात.
1. ‘Request for Transfer of Account’ : EPFO पोर्टलवरील ‘Online Services’ विभागात हा पर्याय उपलब्ध आहे. यामधून जुन्या PF खात्यातील रक्कम नव्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी थेट अर्ज करता येतो.
2. ‘Member Service History’ : EPFO 3.0 अंतर्गत हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. येथे कर्मचाऱ्याला पूर्वीच्या आणि सध्याच्या नोकरीचा तपशील, प्रलंबित ट्रान्सफर क्लेमची माहिती पाहता येते. क्लेम प्रलंबित नसल्यास ‘Claim’ पर्यायावर क्लिक करून Form-13 द्वारे ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू करता येते.
PF ट्रान्सफर करण्यासाठी कसं अप्लाय करायचं?
– UAN वापरून EPFO मेंबर पोर्टलवर लॉग-इन करा.
– जुन्या कंपनीचा Member ID आणि आवश्यक माहिती भरा.
– ‘Get Details’ वर क्लिक करा.
– आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून माहितीची पडताळणी करा.
– सध्याच्या कंपनीचा तपशील तपासून अर्ज सबमिट करा.
– पडताळणीनंतर EPFO जुना PF बॅलन्स नव्या खात्यात ट्रान्सफर करेल.
EPF म्हणजे काय?
EPF ही केंद्र सरकारची निवृत्ती बचत योजना असून कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचाऱ्याच्या मूलभूत वेतन व महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPF वर 8.25 टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे.
कर्मचाऱ्यांना काय फायदा?
– PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ.
– कागदपत्रांचा त्रास कमी.
– सर्व PF बचत एकाच खात्यात ठेवणे सोपे.
– नोकरी बदलल्यानंतर PF ट्रान्सफरमध्ये होणारा विलंब कमी होण्यास मदत.
– ऑनलाइन OTP पडताळणीमुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित.