LPG यूजर्ससाठी मोठी बातमी! स्वयंपाक घरातही होणार ‘इथेनॉल’ ची एन्ट्री, ‘मास्टर’ प्लॅन काय?

Ethanol Based Cooking Stoves यापूर्वी सरकारच्या निर्देशानुसार इथेनॉलवर चालणाऱ्या कुकिंग स्टोव्हची चाचणीही घेण्यात आली आहे.

Ethanol Based Cooking Stoves

Ethanol Based Cooking Stoves

Government Plans Ethanol Based Cooking Stoves for Households : पेट्रोलमध्ये E20 इथेनॉल मिश्रण लागू केल्यानंतर केंद्र सरकार आता घरगुती स्वयंपाकाच्या इंधनातही मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. LPG ला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय नवे धोरण तयार करत आहे. हे धोरण लागू झाल्यास देशातील लाखो कुटुंबांना स्वच्छ आणि पर्यायी इंधनाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सरकारचे उद्दिष्ट केवळ LPG ला पर्याय निर्माण करणे नसून, ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणे, इंधन आयातीवरील खर्च कमी करणे आणि देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या इथेनॉलचा प्रभावी वापर करणे असल्याचे सांगितले जात आहे.

सप्टेंबरपर्यंत धोरण जाहीर होण्याची शक्यता

मंत्रालयाकडून तयार होत असलेल्या या धोरणाचा मसुदा सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. इंधन क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योग संघटनांशी याबाबत चर्चा सुरू असून, घरगुती स्वयंपाकासाठी इथेनॉलचा सुरक्षित आणि प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सरकार काम करत आहे.

इथेनॉल स्टोव्हला मिळू शकते सबसिडी

या योजनेला गती देण्यासाठी सरकार इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हसाठी अनुदान देण्याचाही विचार करत आहे. हे अनुदान स्टोव्ह खरेदीसाठी एकरकमी मदत किंवा वापरासाठी नियमित आर्थिक सहाय्य अशा स्वरूपात असू शकते. यापूर्वी सरकारच्या निर्देशानुसार इथेनॉलवर चालणाऱ्या कुकिंग स्टोव्हची चाचणीही घेण्यात आली असून, त्याचे प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

इथेनॉल ATM ची संकल्पना

या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘इथेनॉल ATM’ होय. सरकार पेट्रोल पंपांवर अशी यंत्रणा उभारण्याचा विचारात आहे, जिथून ग्राहक आपल्या इथेनॉल स्टोव्हसाठी कॅनिस्टरमध्ये इथेनॉल भरून घेऊ शकतील. यामुळे इथेनॉलची उपलब्धता आणि पुरवठा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

देशात इथेनॉलचे अतिरिक्त उत्पादन

सध्या भारतात इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केअरएज रेटिंग्सच्या अहवालानुसार, देशाची वार्षिक उत्पादन क्षमता 20 अब्ज लिटरपेक्षा अधिक झाली असून, चालू आर्थिक वर्षात आणखी 4 अब्ज लिटर क्षमतेची भर पडण्याची शक्यता आहे. यापैकी सुमारे 11 अब्ज लिटर इथेनॉल E20 पेट्रोल मिश्रणासाठी वापरले जाते. 3 ते 3.5 अब्ज लिटर मद्य, औषध आणि रासायनिक उद्योगांकडून वापरले जाते. त्यानंतरही जवळपास 7 अब्ज लिटर इथेनॉलची क्षमता वापराविना उपलब्ध आहे. त्यामुळे सरकार ही अतिरिक्त क्षमता घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्याचा विचार करत आहे.

ऊर्जा सुरक्षेलाही मिळणार बळ

पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे भारताच्या LPG आयातीवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन सरकार पर्यायी इंधनांवर भर देत आहे. इथेनॉलचा वापर वाढल्यास LPG आयात कमी करण्यास मदत होईल आणि ऊर्जा सुरक्षाही अधिक मजबूत होईल. याशिवाय, अतिरिक्त इथेनॉलचा वापर देशांतर्गत वाढवल्यानंतर नेपाळ, बांगलादेश आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये त्याच्या निर्यातीच्याही संधी निर्माण होऊ शकतात.

LPG बंद होणार का?

स्वयंपाक घरात इथेनॉलची एन्ट्री झाल्यास सध्या वापरात असलेला LPG बंद होणार का? असा प्रश्न यामुळे पडला असेल तर, सध्या तरी LPG सिलिंडर बंद करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय नाहीये. प्रस्तावित धोरणाचा उद्देश LPG ची जागा घेणे नसून, त्याला स्वच्छ, स्वदेशी आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे धोरण अंतिम झाल्यानंतर इथेनॉल स्टोव्ह, सबसिडी, इंधन पुरवठा आणि अंमलबजावणीची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट होणार आहे. पण, जर हे धोरण प्रत्यक्षात आले, तर पेट्रोलनंतर आता भारतीय स्वयंपाकघरातही इथेनॉलची एन्ट्री होऊ शकते. त्यामुळे इंधन आयात कमी होण्यास, देशातील अतिरिक्त इथेनॉलचा उपयोग वाढण्यास आणि ग्राहकांना स्वच्छ इंधनाचा नवा पर्याय मिळण्यास मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version