महिलांना समान अधिकार, कामगारांसाठी लढा, शेतकऱ्यांचे कैवारी, अर्थशास्त्रतज्ञ, कायदेतज्ञ, राजनीतीकार, दलित उद्धारकर्ते, बौद्ध धर्म पुर्नजीवक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांची आज 132 वी जयंती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. वडील रामजी ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते. तर आईचे नाव भिमाबाई होते. मध्य प्रदेशानंतर, दापोली, सातारा मुंबईत आंबेडकरांच्या कुटुंबाने वास्तव्य केलं. त्यांच सुरुवातीचं शिक्षण साताऱ्यातल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये झालं. आपलं शिक्षण पूर्ण करीत असताना त्यांची अवहेलेनला सामोरं जावं लागलं.
1907 साली बाबासाहेब साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी बीएची पदवी घेतली. अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी संपादन करुन पुढे त्याच विषयात पीएच.डी केली. 1925 मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी’. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले.
पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. परदेशातल्या विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी दोन विषयात आपलं एम.ए.चं शिक्षण पूर्ण केलं. दोन विषयात पीएच.डी. मिळवली. बार-अॅट-लॉ आणि डी. एससी पदवी घेतली. ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेतल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले.
उच्च शिक्षणानंतर भारतात असलेली जातीव्यवस्था, वर्णव्यवस्थेविरोधात त्यांनी लढा सुरु केला. कारण शिक्षण सुरु असताना त्यांनाही भारतातील उच्चवर्णीयांच्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं. सर्वप्रथम त्यांनी अस्पृश्य समाजाची कैफियत मांडण्यासाठी 1920 साली ‘मूकनायक’ 1927 साली ‘बहिष्कृत भारत’, 1930 साली ‘जनता’ आणि प्रबुद्ध भारत अशा वृत्तपत्रे सुरु करत प्रस्थापितांवर प्रभाव टाकला.
सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी 20 जुलै 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा, 19 मार्च 1927 समता सैनिक दल, 29 जुलै 1944 साली ‘द बॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपलं कार्य सुरू केले.
शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुले राहण्यासाठी 14 जून 1928 साली डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी आणि 8 जुलै 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणली. अस्पृश्यांच्या अधिकारांप्रती जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन मजूर वर्गासाठी लढा उभारला. 19 जुलै 1942 साली शेड्यल्ड कास्टस् फेडरेशन तर 3 ऑक्टोबर 1957 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापन केली.
देशाची पहिली संसद अर्थात संविधान सभेवरही बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले होते. त्यावेळी संविधान सभेने एकूण 7 जणांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली. बाबासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ असल्याने त्यांच्यावर घटना तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. सलग 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे सादर केले. त्यानंतर संविधान सभेने भारताचे संविधान एकमताने मंजूर करत 26 जानेवारी 1950 पासून अंमलबजावणी करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळातले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दोन विशेष सत्याग्रह गाजलेले आहेत. त्यांनी अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन देशात एक नवा इतिहास घडवला. 20 मार्च 1927 रोजी आपल्या अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला होता. त्यावेळच्या सवर्ण हिंदुकडून त्यावेळी कडाडून विरोध झाला पण बाबासाहेबांनी हे आंदोलन यशस्वी करुन दाखवले. तर 2 मार्च 1936 साली नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह करुन अस्पृश्य समाजाला मंदिरांमध्ये प्रवेश मिळवून दिला.
सामजिक आंदोलनांसोबत त्यांनी आपल्या अनेक ग्रथांची निर्मिती करत समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य केलं. डॉ. आंबेडकरांनी ‘द अनटचेबल्स, शुद्र पूर्वी कोण होते?, बुद्ध अॅण्ड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुजम, महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्टेट्स अँड मायनॉरिटिज’ असे ग्रंथ लिहिले आहेत.
शेती देशातला पायाभूत उद्योग समजून शेतकऱ्यांचा अर्थिक विकास व्हायलाच हवा असा पवित्रा घेत त्यांनी शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची संकल्पना मांडली होती. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांच्या संकल्पनेतून सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, नद्यांच्या खोर्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजनांवर अंमलबजावणी करण्यात आली होती.
सामाजिक चळवळ उभारत असताना त्यांनी नाशिकच्या येवल्यात एका सभेत आपल्या अनुयायांना ‘मी हिंदु धर्मात जन्माला आलो पण हिंदु धर्मात मरणार नाही’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनतर त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला. आपल्यानंतर हिंदु समाज अस्पृश्यांना हिन वागणूक देईल ही दूरदृष्टी मनात ठेवून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध भिक्खूच्या साक्षीने बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर 1956 साली ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेलाही उपस्थित राहिले होते. त्यानंतर ते राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी होते. भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यावर त्याचं पुस्तक लिहिण्याच काम सुरु असताना त्यांच्यासाठी 6 डिसेंबर 1556 ची काळरात्र ठरली. लाखो अस्पृश्यांना, महिलांना, शेतकरी, कामगारांसाठी झटणाऱ्या नेत्याची अखेर प्राणज्योत मालवली.