FSSAI Guidelines For 100 Percent Purity : सुपरमार्केटमध्ये किंवा किराणा दुकानात खरेदी करताना ‘100% Pure’, ‘100% Natural’ किंवा ‘100% Organic’ असे दावे पाहून अनेक ग्राहक उत्पादनावर विश्वास ठेवतात. मात्र, हे दावे खरोखर कितपत सत्य असतात? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ‘100% Pure’ असा दावा करणाऱ्या काही उत्पादनांवरून डाबर इंडिया एफएसएसएआयच्या (FSSAI) रडारवर आली आहे. या कारवाईमुळे ‘100% शुद्ध’, ‘100% नैसर्गिक’ आणि ‘100% ऑर्गेनिक’ अशा दाव्यांबाबत एफएसएसएआयचे नियम नेमके काय आहेत, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
UPI यूजर्ससाठी मोठी बातमी! पैसे पाठवण्यापूर्वी दिसू शकतो ‘YES/NO’ अलर्ट…
नेमकं डाबरच्या उत्पादनांमध्ये काय आढळलं?
एफएसएसएआयच्या तपासात डाबरच्या काही उत्पादनांवर नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. Dabur Homemade Coconut Milk या उत्पादनावर ‘100% Purity’ असा दावा करण्यात आला होता. मात्र, हे उत्पादन एकापेक्षा अधिक घटकांचे (Compound Food) असल्याने असा दावा नियमांनुसार करता येत नाही. याशिवाय Dabur Himalayan Organic Apple Cider Vinegar आणि Dabur Organic Honey या उत्पादनांवर वैध सेंद्रिय प्रमाणपत्राशिवाय ‘जैविक भारत’ लोगो वापरण्यात आल्याचेही एफएसएसएआयने निदर्शनास आणले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एफएसएसएआयने डाबरला अशाच भ्रामक दाव्यांबाबत नोटीस बजावली होती. मात्र, समाधानकारक सुधारणा न झाल्याने यावेळी नियामकाने थेट संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच FSSAI डाबरच्या काही उत्पादनांवरील ‘100% Purity’ आणि ‘100% Organic’ या दाव्यांवर आक्षेप घेत संबंधित उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश देत कंपनीला 15 दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
QR कोड स्कॅन केला आणि पैसे दोनदा कट झाले? UPI व्यवहारात पैसे परत मिळवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
‘100% Pure’ लिहिण्यासाठी FSSAI चे नियम काय सांगतात?
FSS (Advertising and Claims) Regulations, 2018 नुसार कंपन्यांनी पॅकेजिंग आणि जाहिरातींमध्ये केलेला प्रत्येक दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येण्यासारखा आणि ग्राहकांची दिशाभूल न करणारा असणे आवश्यक आहे.
1. ‘100% Pure’
हा दावा केवळ अशाच उत्पादनांसाठी करता येतो, जे एकाच घटकापासून (Single Ingredient) तयार झालेले असतात आणि ज्यामध्ये कोणतेही बाह्य मिश्रण, प्रक्रिया किंवा घटकांची भर घातलेली नसते. त्यामुळे बहुतांश पॅकेजबंद आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांना हा दावा लागू होत नाही.
2. ‘100% Natural’
‘100% Natural’ असे लिहिण्यासाठी उत्पादनात कृत्रिम रंग, फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह किंवा रसायने नसणे आवश्यक आहे. तसेच उत्पादनावर अत्यल्प प्रक्रिया झालेली असावी.
3. Compound Food वर बंदी
जर उत्पादनात दोन किंवा अधिक घटक असतील, जसे की कोकोनट मिल्क, फ्लेवर्ड ज्यूस, बिस्किटे किंवा इतर प्रक्रिया केलेले पदार्थ, तर त्यावर ‘100% Pure’ किंवा ‘100% Purity’ असा दावा करण्यास परवानगी नाही.
4. ‘100% Organic’
‘100% Organic’ असा दावा करण्यासाठी NPOP किंवा PGS-India यांचे अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच ‘जैविक भारत’ लोगो वापरण्यासाठीही आवश्यक मंजुरी असावी लागते.
गुंतवणूकदारांची होणार चांदी! अडकलेले शेअर्स पटकन मिळणार?; सरकार ‘मास्टर’ प्लान करतंय
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
एफएसएसएआयने ग्राहकांना केवळ पॅकेटवरील आकर्षक दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यात ‘100% Pure’, ‘100% Healthy’ अशा घोषणांकडे केवळ मार्केटिंगच्या दृष्टीने पाहा. उत्पादनावरील घटकांची यादी काळजीपूर्वक वाचा. त्यात प्रिझर्वेटिव्ह, साखर, कृत्रिम फ्लेवर किंवा इतर अॅडिटिव्ह असल्यास ‘100%’ चा दावा संशयास्पद ठरू शकतो. तसेच सेंद्रिय उत्पादन खरेदी करताना FSSAI परवाना क्रमांक आणि ‘जैविक भारत’ लोगोची खात्री करा.
डाबरच्या शेअरवरही परिणाम
एफएसएसएआयच्या आदेशानंतर शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटले. डाबर इंडियाच्या शेअरमध्ये व्यवहारादरम्यान सुमारे 4.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
‘100%’ लिहिलं म्हणजे उत्पादन 100% शुद्ध असतंच असं नाही…
पॅकेटवरील ‘100% Pure’, ‘100% Natural’ किंवा ‘100% Organic’ अशा दाव्यांवर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा ग्राहकांनी उत्पादनावरील घटकांची यादी, FSSAI परवाना, प्रमाणपत्रे आणि लेबलवरील माहिती तपासूनच खरेदी करणे अधिक सुरक्षित आहे.
